आसाममधील पूरस्थिती गंभीर, आणखी ८ जणांचा मृत्यू

गुवाहाटी : २० जून – आसाममधील पूरस्थिती रविवारी आणखी गंभीर झाली. या महापुरात आणखी आठ जण मृत्युमुखी पडले आहेत. ३२ जिल्ह्यांतील ३७ लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे नवनवीन भागांना पुराचा फटका बसत आहे.
आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आणि दिवसभरात वेगवेगळय़ा ठिकाणी पाच जण बुडाले. यामुळे राज्यात आतापर्यंत पूर आणि भूस्खलनात एकूण मृतांची संख्या ७० वर गेली आहे. प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यातील ३२ जिल्ह्यांतील चार हजार ४६२ गावांमध्ये ३७ लाख १७ हजार ८०० हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला. राज्यात ५१४ मदत-निवारा छावण्यांत एक लाख ५६ हजार पूरग्रस्तांनी आश्रय घेतला आहे.
आसामची राजधानी गुवाहाटी शहरात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पुराचे पाणी छातीपर्यंत, तर काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत आले आहे.

Leave a Reply