अग्निवीर भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर, विरोध करणाऱ्या तरुणांना या योजनेची दारे बंद

नवी दिल्ली : २० जून – देशभर हिंसक विरोध झालेल्या वादग्रस्त अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असून लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर, ‘अग्निपथ’ विरोधातील जाळपोळ आणि तोडफोडीत सामील झालेल्या तरुणांना या योजनेची दारे बंद असतील, असा इशाराही दिला.
‘अग्निपथ’मध्ये भरती होताना अर्जदार तरुणांना, या योजनेच्या विरोधातील जाळपोळीत सामील नसल्याचे किंवा आंदोलनात भाग घेतला नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले, ‘‘शिस्त हा भारतीय संरक्षण दलाचा पाया आहे. येथे जाळपोळ-तोडफोड आणि निदर्शनांना थारा नाही.’’ अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी अर्ज दाखल करताना संबंधित उमेदवाराला या योजनेविरोधातील कोणत्याही स्वरूपाच्या आंदोलनात सामील न झाल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. तसेच प्रत्येक उमेदवाराची पोलीस पडताळणी करण्यात येईल. एखाद्याविरुद्ध गुन्हा (एफआयआर) दाखल असेल, तर त्याला भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असेही लेफ्टनंट जनरल पुरी यांनी नमूद केले.
तिन्ही सशस्त्र दलांनी रविवारी अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी एक व्यापक कार्यक्रम जाहीर केला. संरक्षण दलातील जवानांचे सरासरी वय कमी करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तिन्ही दलांनी भरती प्रक्रियेचा तपशील जाहीर केला.
लेफ्टनंट जनरल यांनी या योजनेचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले, ‘‘संरक्षण दलांच्या तीन शाखांमधील जवानांची सरासरी वयोमर्यादा कमी करण्याचा मुद्दा बऱ्याच काळापासून विचाराधीन होता. कारगिल पुनरावलोकन समितीनेही याची गरज अधोरेखित केली होती. या योजनेसंदर्भात प्रदीर्घ चर्चा-विचारविनिमय झाला आहे. आम्ही अन्य देशांच्या संरक्षण दलांचाही अभ्यास केला.’’ तरुणांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता असते. धाडसाची आवड असते. ‘जोश’ आणि ‘होश’ त्यांच्यात सारखाच असतो. त्यामुळे सरकार ही योजना लागू करत आहे. तरुणांनी योजनेविरोधातील आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही पुरी यांनी केले. कोणत्याही परिस्थितीत ही योजना आता मागे घेतली जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या योजनेंतर्गत अग्निवीरांची भरतीच्या नौदलाच्या योजनेची माहिती देताना, व्हाइस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले, की नौदल मुख्यालय २५ जूनपर्यंत भरतीसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे प्रसृत करेल. पहिल्या तुकडीचा प्रशिक्षण कार्यक्रम २१ नोव्हेंबपर्यंत सुरू करण्यात येईल. या योजनेंतर्गत नौदलात महिला आणि पुरुष अशा दोघांचीही भरती केली जाणार आहे.
अग्निपथ भरतीबाबत हवाई दलाच्या योजनेबद्दल एअर मार्शल एस. के. झा यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की नोंदणी प्रक्रिया २४ जूनपासून सुरू होईल आणि भरतीच्या पहिल्या टप्प्यासाठी ऑनलाइन परीक्षा २४ जुलैपासून सुरू होईल. हवाई दलात ३० डिसेंबपर्यंत पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू करण्याचा विचार आहे.

Leave a Reply