ही निवडणूक संभव आहे, असंभव नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई : १९ जून – विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. या दरम्यान भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. या आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांची मुंबईतील ताज प्रेसिडेंड हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत त्यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं. महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हा राज्यसभेच्या निवडणुकीत हलला होता. पण आता येत्या 20 तारखेला तो थेट कोसळेल, असा दावा फडणवीसांनी केला आहे.
भाजपच्या सर्व आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ताज प्रसिडेंट या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीला काही आमदार उपस्थित राहू शकले नव्हते. दरम्यान या बैठकीत फडणवीसांनी त्यांच्या आमदारांचे मनोबल वाढवले. यावेळी त्यांनी सर्व आमदारांचे अभिनंदन केलं. त्याचप्रमाणे राज्यसभेला तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे 10 तारखेला महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हलला आता आपले पाचही उमेदवार निवडून आणल्यास महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला कोसळेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपचे आणखी काही आमदार मुंबईत येणे बाकी आहे. त्यांना त्यांना लवकरात लवकर मुंबईत पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस उद्या सर्व आमदारांना दुपारी 4 वाजता मार्गदर्शन करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “कुणाच्याही अंतर्गत वादात मी बोलणार नाही. तीनही पक्षांमध्ये मतभेद आहेत. कुणाचाही कुणामध्ये मेळ नाही. आपला उमेदवार निवडून येईल यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत. जो असंतोष आहे त्याला वाट मिळाली पाहिजे. आम्ही पाचवा उमेदवार उभा केला आहे. ही निवडणूक संभव आहे, असंभव नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply