फारूक अब्दुल्ला यांचा राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीला नकार

श्रीनगर : १९ जून – नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी शनिवारी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांच्या संयुक्त आघाडीच्या उमेदवार होण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले, की सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असलेल्या जम्मू-काश्मीर या आपल्या राज्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आपले नाव उमेदवार म्हणून निवडल्याबद्दल त्यांनी विरोधी पक्षांचे आभार मानले.
नॅशनल कॉन्फरन्सतर्फे दिलेल्या निवेदनात फारूक यांनी नमूद केले आहे, की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माझे नाव संयुक्त विरोधी पक्षांचा राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार म्हणून सुचवले, हा मी माझा सन्मान समजतो. इतर विरोधी पक्षनेत्यांचेही मला पाठिंबा दर्शवणारे दूरध्वनी मला आले. या अनपेक्षित प्रस्तावावर मी कुटुंबीयांसह पक्षातील ज्येष्ठ सहकाऱ्यांशी विचारविनिमय केला. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी माझ्या नावाचा विचार झाला व त्यासाठी मला जो पाठिंबा मिळाला, त्यामुळे मी भावविवश झालो आहे. परंतु, माझ्या जम्मू-काश्मीरवर सध्या अत्यंत कठीण काळ आला आहे. या अनिश्चित काळात राज्याला मार्गदर्शन करण्यासाठी माझे योगदान अत्यंत गरजेचे आहे.
फारूक यांनी नमूद केले आहे, की आगामी काळात देशासह जम्मू-काश्मीरच्या सेवेसाठी सकारात्मक योगदान देण्याचा माझा मानस आहे. संयुक्त विरोधी पक्षांच्या सर्वसंमतीने उभ्या केल्या जाणाऱ्या उमेदवाराला माझा पाठिंबा असेल.

Leave a Reply