आसाममध्ये भीषण पुराचा २८ जिल्ह्यातील १९ लाख नागरिकांना फटका, ५५ जणांचा मृत्यू

गुवाहाटी : १९ जून – अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात २८ जिल्ह्यांतील तब्बल १९ लाख नागरिकांना या महापुराचा फटका बसला आहे. होजाई जिल्ह्यात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी नाव उलटली असून, तीन मुले बेपत्ता झाली आहेत, तर २१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. राज्यात आतापर्यंत दरड कोसळून व पुरामुळे ५५ जण मृत्युमुखी पडले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील पूरस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे विविध ठिकाणच्या मदत शिबिरांत आश्रयास आलेल्या पूरग्रस्तांची भेट घेत आहेत. मोदींनी मुख्यमंत्र्यांना फोन करून पूरस्थितीची माहिती घेतली. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले आहे. पूरग्रस्त आसामवासीयांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत असल्याचे मोदींनी ट्विटद्वारे नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी मोदींना धन्यवाद देत सांगितले, की आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पूरग्रस्तांना सर्वोत्तम व सर्वतोपरी साहाय्य करत आहोत. मुख्यमंत्री सरमा यांनी कामरूप जिल्ह्यातील पूरग्रस्त रंगिया भागाला भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला. भाजपचे आसाम प्रदेशाध्यक्ष व स्थानिक आमदार भाबेश कालिता हेही त्यांच्यासोबत होते. फातिमा कॉन्वेंट स्कूलमधील मदत शिबिर व कोलाजाल येथेही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. या वेळी पत्रकारांशी बोलताना सरमा म्हणाले, की प्रशासन सज्ज असून, संकटाला तोंड देण्यासाठी तयार आहे.
आसाममध्ये शुक्रवारी रात्री उशिरा इस्लामपूर गावातून २४ ग्रामस्थांचा एक गट सुरक्षित ठिकाणी नावेतून जात असताना रायकोटा परिसरात बोट पाण्यात बुडालेल्या एका वीटभट्टीवर धडकून उलटली व बुडाली. त्यातील तीन मुले बेपत्ता आहेत. राज्यभर ३७३ मदत-निवारा शिबिरांत एक लाख आठ हजारांहून अधिक पूरग्रस्तांनी आश्रय घेतला आहे.

Leave a Reply