अमरावतीत ढगफुटीसदृश्य पाऊस

अमरावती : १९ जून – अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात शनिवारी मुसळधार पाऊस कोसळला आहे. चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव येथे सलग ३ तास सुरू असलेल्या पावसाने ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी गावाच्या चौकातील टपऱ्यांसमोर उभी असलेली दुचाकी वाहने वाहून गेल्याचंही पाहायला मिळालं.
पेरणीच्या तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. जूनचा अर्धा महिना संपला तरी पाऊस न पडल्याने बळीराजा काहीसा चिंतेत होता. मात्र शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील तिवसा, चांदुर रेल्वे, चांदुर बाजार, अचलपूर, परतवाडा, अंजनगाव, धारणी आणि चिखलदरा या भागातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.
मान्सून उशिरा दाखल झाल्याने शेतीची कामे पूर्णपणे रखडली होती. मात्र शनिवारी झालेल्या पावसाने शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागले आहेत.
जिल्ह्यातील करजगाव, शिरजगाव, बहीरम आणि इतर भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठं नुकसान झालं. ग्रामीण भागात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी वाहून गेल्या. तसंच अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवण्यात आलेले धान्य मोठ्या प्रमाणात ओले झाले आहे. यामध्ये हरभरा, तूर आणि काही प्रमाणात सोयाबीन अशी सुमारे २००० ते २२०० धान्याची पोती ओली झाली आहेत.
कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार कोरडवाहू शेतकर्यांनी पेरण्या थांबवल्या होत्या. मात्र शनिवारपासून दाखल झालेल्या समाधानकारक पावसाने पुन्हा शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे.

Leave a Reply