संपादकीय संवाद – अग्निपथ प्रकरणात तरुणाई आणि सेनाधिकाऱ्यांमध्ये संवाद आवश्यक

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तरुणांसाठी अग्निपथ ही योजना घोषित केली, आणि दुसऱ्याच दिवशी देशभर आंदोलनाचा आगडोंब उसळला आहे, हजारो तरुण ठिकठिकाणी रस्त्यावर आले आहेत, आणि अनेक ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळणही घेतलेले दिसून येत आहे. हे बघता देशातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात तर येणार नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे.
त्याचवेळी देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी तरुणांनी योजना नीट समजावून घ्यावी, आणि मग त्यावर निर्णय घ्यावा असे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही योजना कुणाचेही नुकसान करणारी नाही, किंबहुना देशातील बहुसंख्य तरुणांना त्याचा फायदाच होणार आहे.
मनोज पांडे यांचे वक्तव्य बघता तरुणाईने खरोखरीच हे प्रकरण नीट समजावून घ्यावे असे सुचवावेसे वाटते, वस्तुतः देशात योजना आखण्यासाठी वरच्या स्तरावर बसलेले वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेते, हे अकारण कुणाचेही नुकसान करणार नाही. त्यांनी पूर्ण विचारांतीच ही योजना निश्चित केली असणार, अश्यावेळी योजना नीट समजावून घेणे आणि मगच त्यावर व्यक्त होणे, हे केव्हाही श्रेयस्कर ठरते. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, त्याचनुसार प्रत्येक योजनेलाही दोन बाजू असतात, एक चांगली आणि एक वाईट अशी ती बाजू असते. अनेकदा सत्ताधाऱ्यांचे राजकीय विरोधक राजकीय विरोधासाठी अश्या योजनांची काळी बाजूच जनतेसमोर मांडतात, आणि जन्मात भडकवण्याचा प्रयत्न केला जातो, अश्यावेळी चांगल्या योजनाही कारण नसतांना तहानद्याबस्त्यात टाकल्या जातात.
अश्यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि सत्ताधारी यांनी एक पाऊल समोर येत सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन योजनेची चांगली बाजू समजावून सांगणे गरजेचे असते. तसे झाले तरच असे संघर्ष टळू शकतात. मात्र त्याचवेळी संबंधितांनी देखील सरकारची बाजू समजून घेणे गरजेचे ठरते. असे असले तरी बरेचदा विरोधक आंदोलनकर्त्यांना भडकवण्याचे काम करतात आणित्यामुळे प्रकरण चिघळत जाते, याचे उत्तम उदाहरण शेतकरी कायद्याच्याबाबत दत्त येईल, त्या प्रकरणात केंद्र सरकार चर्चेला तयार होते, मात्र शेतकरी नेते ऐकून घ्यायला तयार नव्हते, परिणामी आंदोलन चिघळत गेले, आणि चांगले कायदे बासनात गुंडाळून ठेवावे लागले. हा मुद्दा लक्षात घेता या प्रकरणात केंद्र सरकारने तरुणाईला विश्वासात घेऊन नेमकी योजना समजावून सांगणे गरजेचे आहे, या प्रकरणात अनेक निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी काही आक्षेप घेत काही सूचनाही केल्या आहेत, त्याचाही विचार व्हायला हवा. तसे झाले तर हा संघर्ष टळेल, अन्यथा छोट्या छोट्या गोष्टींवरून संघर्ष वाढेल आणि त्याचे पर्यवसान अराजकात होऊ शकेल, ही भीती लक्षात घेतली पाहिजे. देशाचे नेतृत्व निश्चितच सुजाण आहे, त्यामुळे ते निश्चित पाऊले उचलतील, हा पंचनामाला विश्वास आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply