संपादकीय संवाद – पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजितदादांचा कथित अपमान – एक निरर्थक वाद

काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याजवळच्या देहू या गावात आले होते, देहू हे गाव सोळाव्या शतकातील ख्यातनाम संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. त्याठिकाणी तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या समारोहासाठी ते आले होते, या समारोहात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू दिले नाही, हा मुद्दा प्रचंड गाजतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि अजित पवारांची बहीण सुप्रिया सुळे यांना या प्रकरणाचा प्रचंड राग आला, आणि त्यांनी आदेश देताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनेही सुरु केली.
या प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी नाकारून प्रोटोकॉलचा भंग झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस करते आहे, मात्र प्रोटोकॉल हा शासकीय कार्यक्रमात असतो, आणि देहूचा कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम नव्हताच. तरीही प्रोटोकॉलचा भंग झाल्याचा आरोप सातत्याने केला जातो आहे. खासगी कार्यक्रमांमध्ये कुणाची भाषणे ठेवावी, याचा निर्णय कार्यक्रमाचे आयोजक आणि पंतप्रधान कार्यालय असे मिळून घेत असतात, जर पंतप्रधान कार्यालयाने कार्यक्रम ठरवतांना एखादे नाव गाळले असेल, तर आयोजक तिथे आग्रह धरू शकतात. इथे पंतप्रधान कार्यालयाने ते नाव गाळले असेल तर आयोजकांनी आग्रह धरायला हवा होता, अश्यावेळी आयोजकांनी आग्रह धरला नसेल तर त्याला भारतीय जनता पक्षाचे नेते कसे जबाबदार राहू शकतात, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या प्रकारासाठी भाजपला जबादार धरून भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप करीत आहेत. त्याचबरोबर भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी,अशीही मागणी करत आहेत.
इथे आणखी एका बाबीकडे वाचकांचे लक्ष वाढायचे आहे, ज्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे भाषण आटोपले, आणि निवेदकाने पंतप्रधान मोदींचे नाव भाषणासाठी पुकारले त्यावेळी अजितदादांच्या नाव सुटले हे मोदींच्या लक्षात आले होते, पंतप्रधानांनी याकडे लक्ष वेधत अजितदादांना भाषणासाठी यावे, असे सुचवलेही होते, मात्र अजितदादांनी त्याला नकार दिला,. आता इथे उपमुख्यमंत्र्यांनी देशाच्या पंतप्रधानांची सूचना नाकारून पंतप्रधानांचा अवमान केला, असाही आरोप करता येऊ शकतो. मात्र सुदैवाने अजूनपर्यंत कुणी तसा आरोप केलेला नाही. हे सुदैवच म्हणावे लागेल.
महाराष्ट्रात महाआघाडीचे सत्तेत आलेले सरकार हे अनैसर्गिक सरकार म्हणून ओळखले जाते, या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी करावी आणि सरकार स्थापन करावे यासाठी २०१९ मध्ये मतदारांनी कौल दिलेला नव्हता, हे बघता अजित पवार हे पूर्ण महाराष्ट्राने निवडून दिलेले उपमुख्यमंत्री होऊ शकत नाही, तरीही अजित पवार म्हणजे पूर्ण महाराष्ट्र असा दावा सुप्रिया सुळे करतात, तेही चुकीचेच मानावे लागेल. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, त्यामुळे फार तर फार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अपमान आहे, असे म्हणता येईल.
तरीही या प्रकारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जो गोंधळ घातला जातो आहे, तो अनाठायीच म्हणावा लागेल. कोणतातरी मुद्दाकाढून राजकारण करायचे आणि महत्वपूर्ण मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करायचे हा महाआघाडीच्या नेत्यांचा उद्योग सुरु आहे, त्यातलाच हा एक प्रकार म्हणावा लागेल. एकूणच हा राष्ट्रवादी काँग्रेसने निरर्थक वाद उभा केला आहे, इतकेच इथे म्हणता येईल.

अविनाश पाठक

Leave a Reply