ईडी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचे जोरदार आंदोलन

नवी दिल्ली : १५ जून – नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी मंगळवारी ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची तब्बल दहा तास चौकशी केली आहे. आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशी बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत, ईडी कार्यालयाबाहेर टायर जाळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.
काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गाँधी यांना समन्स जारी केला होता. १३ जून रोजी दिल्ली ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. १३ जून आणि १४ जून रोजी चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. काल दहा तास चौकशी झाल्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी बोलवल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.
यावेळी राहुल गांधी यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू असताना बाहेर टायर पेटवले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपस्थित पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच काही काँग्रेस नेत्यांना घरात कैद करण्यात आल्याची माहिती देखील समजत आहे. काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार देपेंदर हुड्डा यांना पोलिसांनी घरात कैद केलं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
एका राज्यसभा खासदाराला अशाप्रकारे कैद करणं कोणता कायद्यात बसतं? काँग्रेस खासदारांना कैद करून भाजपा सरकार आम्हाला घाबरवू शकत नाही. आज प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधींचा आवाज आहे, असं संबंधित ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply