मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

मनाचे स्वातंत्र्य…..

आज प्रत्येकाला वाटत, आपण मनासारखं जगावं, नाही कोणाची कटकट ना कोणाची भिती.आपल्याला हवे तसे वागण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे म्हणून एखाद्या क्षणी आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटली तरी ती करता येईलच असे नाही. परीक्षेच्या दिवसात मला नेहमी वाटते की आपण परीक्षेला जातो असे सांगून कुठेतरी दुसरीकडेच फिरायला जावे. परीक्षा न देऊन होणारे नुकसान लक्षात घेतले की आपण शहाण्या मुलासारखे मनास मुरड घालतो. परीक्षा हॉल मध्ये गेलो कि मला नेहमी गाणी गुणगुणावीशी वाटतात पण गाणार कशी ? कविताही सुचतात कधी-कधी पण लिहिणार कुठे ? हातात आलेली प्रश्नपत्रिका सोपी आहे हे पाहून शेजारच्या बाकावरील मैत्रिणीस आनंदाने टाळी द्यावीशी वाटली तरी ती देता कुठे येते. परीक्षेच्या दिवसात खो खोची मॅच असणे, आवडता चित्रपट टी. व्ही. वर लागला असणे यासारख्या गोष्टी मनास अस्वस्थ करत राहतात. पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडल्या तर ‘तडजोड’ हा शब्दच जन्मला नसता. ‘तडजोड’ या एका शब्दापायी माझ्या आयुष्यातील असंख्य आनंदाच्या क्षणांना मुकावे लागते. अर्थात ‘याला जीवन ऐसे नाव’ असे कुणीतरी म्हटले असेल त्यात याचाही समावेश होत असावा.
पावसात भिजायला कोणाला आवडत नाही ? पण जसजसे वय वाढते तसा पाऊस केवळ येता-जाता भेटून जातो. पावसाच्या पाण्यात होड्या सोडायला, साचलेल्या डबक्यात उड्या मारत पाऊस एन्जॉय करणे आपणच सोडून देतो. एकीकडे हव्याहव्याश्या वाटणार्‍या अशा बर्‍याच इच्छा आपल्या प्रतिमेवर डाग लागू नये म्हणून सोडून देतो. त्यापेक्षा’ डाग अच्छे हैं’ म्हणत थोडा एन्जॉय केले तर नक्कीच चांगले.
या सगळ्या गोष्टी थोड्या अशक्यप्राय वाटतात किंवा त्या केल्याने होणारे नुकसान माहित असल्याने आपण त्या करायचे टाळतो पण अशा ही बर्‍याच गोष्टी आहेत ज्या केवळ एका कारणासाठी आपण करावयाचे टाळतो ते म्हणजे ‘लोक काय म्हणतील!’ . मुलांच्या बाबतीत हा प्रकार कमी असेल पण हा विचार बऱ्याच मुली करत असाव्यात. समाजातील आपली प्रतिमा खराब होऊ नये म्हणून मनातील बऱ्याच इच्छा आपण मनातच ठेवतो. त्या कधी पूर्णत्वास येतच नाहीत. या बाबतीत मुले बहुतेकदा बिनधास्त वागण्यामुळे हवे तसे वागू शकतात आणि त्यांना तसे स्वातंत्र्य देण्यात समाजाला काहीच गैर वाटत नाही.

पल्लवी उधोजी

Leave a Reply