पंतप्रधान हे खऱ्या अर्थाने वारकरी – देवेंद्र फडणवीस

पुणे : १४ जून – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी नुकतंच तुकोबारायांचं दर्शन घेऊन व्यासपीठावर दाखल झाले आहेत. यावेळी व्यासपीठावरून आपलं मनोगत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. आपले पंतप्रधान हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत, असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
“तुकाराम महाराजांच्या शब्दांच्या धनात इतकी ताकद होती, की ते शब्द कुणी मिटवू शकले नाहीत. इंद्रायणीत बुडवा किंवा शिळेनं बंद करा. पण ते तुकोबारायांचे शब्द होते, ते शब्द पुन्हा वर आले. त्या शब्दांनी जनाजनाला व्यापून घेतलं. त्यांनी जो मार्ग दाखवला होता त्या मार्गावर चालण्याचं काम आपले पंतप्रधान करत आहेत,” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ हाच मंत्र पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारला आणि गरीब कल्याणाची मोहीम हाती घेत रंजल्या गांजल्यांसाठी काम करत आहेत. म्हणून आपले पंतप्रधान खऱ्या अर्थाने वारकरी आहेत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे.
त्यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटलं की, “वारकऱ्यांमध्ये कुणी मोठं नसतं, कुणी छोटं नसतं, सगळे वारकरी सेवक असतात, आपले पंतप्रधान ‘प्रधानसेवक’ आहेत. त्यामुळे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हेच तर वारकरी संप्रदाय सर्वांना सांगतो. तेच काम मोदी करत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण जगासाठी जे पसायदान मागितलं, संपूर्ण जग आपलं आहे, हा संदेश दिला. नरेंद्र मोदी यांनी देखील करोना काळात संपूर्ण जगाला लसीकरणाचा पुरवठा केला. मोदी यांनी खऱ्या अर्थाने भागवत धर्माचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवत आहे,” असंही फडणवीस यावेळी म्हणाले

Leave a Reply