देशात बुलडोझर, लडाखमध्ये शेपूट असे या सरकारचे धोरण – सामनामधून टोला

मुंबई : १४ जून – शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर रविवारी उत्तर भारतातील अनेक शहरांमधील परिस्थिती तणावपूर्ण होती. उत्तर प्रदेशातील सहारणपूर हिंसाचारातील कथित आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवल्यानंतर रविवारी प्रयागराज येथील आणखी एका संशयित आरोपीचे घर मोठय़ा पोलीस बंदोबस्तात बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईवरुन देशभरामधून टीकेचा सूर उमटत असतानाच आज शिवसेनेनं केंद्रात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकाला लक्ष्य केलं आहे. ‘देशात बुलडोझर; लडाखमध्ये शेपूट’ असं या सरकारचं धोरण असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे. ‘सहाव्या जागेचा मास्टरस्ट्रोक मारणारे चीनला कधी मास्टरस्ट्रोक दाखवणार?’ असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय. चीनने लडाखमध्ये केलेल्या बांधकामावर कधी बुलडोझर चालवणार असंही शिवसेनेनं विचारलं आहे.
देशावर फडफडणाऱ्या संकटाविषयी काही कल्पना आहे काय?
“भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रभक्तीविषयी शंका घ्याव्यात असे वर्तन रोजच त्यांच्याकडून घडत आहे. राजकीय बाजारात जसे नकली हिंदुत्वाचे ठेकेदार घुसले आहेत, तसे नकली राष्ट्रभक्तही मुखवटे लावून वावरत आहेत. राज्यसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष भारतीय जनता पक्ष राज्याराज्यांत करीत आहे. महाराष्ट्रात राज्यसभेची सहावी जागा काय जिंकली, भाजपाने तर ‘बॅण्डबाजा’ लावून विजयी मिरवणुकाच काढल्या. एक राज्यसभा जिंकल्याचा उत्सव जे लोक साजरा करीत आहेत, त्यांना देशावर फडफडणाऱ्या संकटाविषयी काही कल्पना आहे काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.
“पूर्व लडाख सीमेवर चीनने एक एअरबेस निर्माण केला आहे. तेथे त्यांनी ‘जे-२०’ आणि ‘जे-११’सारखी फायटर जेट लढाऊ विमाने तैनात केली आहेत, पण याविषयी मोदी सरकारच्या चेहऱ्यावर एखादी तरी चिंतेची रेषा आज उमटलेली दिसते काय? हा एअरबेस लडाखच्या हद्दीत बनत आहे. म्हणजे चीनने केलेले हे आक्रमण आहे. सहाव्या जागेचा विजयोत्सव साजरा करून ‘मास्टरस्ट्रोक’ मारणाऱ्या चाणक्य मंडळास चीनचा हा ‘मास्टरस्ट्रोक’ खुपू नये याचे आश्चर्य वाटते. चीनने भारताच्या सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. रणगाडे-तोफा तर होत्याच, आता फायटर जेटही आणून ठेवली. एकतर हे लडाखवरचे आक्रमण आहे व दुसरे म्हणजे सार्वभौम भारतास दिलेले लष्करी आव्हान आहे,” असं शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलंय.
काय करतेय तुमची बारीक नजर?
“लडाखच्या हद्दीत चीनने ज्या हालचाली व घुसखोरी सुरू केली आहे त्यावर अमेरिकेचे जनरल चार्ल्स ए. फ्लिन यांनी चिंता व्यक्त केली. लडाखच्या हद्दीत चीनच्या हालचाली म्हणजे धोक्याची घंटा असल्याचे जनरल फ्लिन यांनी सांगितले, पण भारतातर्फे काय सांगितले, तर लडाखमधील चीनच्या हालचालींवर म्हणे आम्ही बारीक नजर ठेवून आहोत. अहो साहेब, तुमची ती बारीक नजर चुकवून चीन आधी गॅलवान व्हॅलीत घुसला व तेथील तीन हजार वर्ग मीटर जमिनीचा ताबा त्यांनी घेतला व आजही चिनी सैन्य त्या ठिकाणी ठाण मांडूनच बसले आहे. इंचभरही मागे हटायला तयार नाही. तुमच्या त्या बारीक नजरेच्या डोळय़ांत धूळ फेकून चीनने लडाखच्या हद्दीत रस्ते, पुलाचे बांधकाम जोरात सुरू केलेय. पेन्गाँग लेकजवळ तर मजबूत पुलाच्या उभारणीचे काम त्यांनी संपवले. काय करतेय तुमची बारीक नजर?,” असा प्रश्न शिवसेनेनं सत्ताधारी भाजपा सरकारला केलाय.
पाकिस्तान आणि चीनची घुसखोरी
“आता तर एअरबेस उभारून ‘जे-20’ फायटर जेट तैनात केली. हा एअरबेस दिल्लीपासून एक हजार किलोमीटरवर आहे व ‘जे-२०’ जेट हे अंतर फक्त २५ मिनिटांत कापू शकेल. ही जेट विमाने एका तासात २१०० किलोमीटर इतके अंतर कापू शकतात. चीनने लडाखच्या हद्दीत ही अशी भारी लढाऊ विमाने मोठ्या प्रमाणात तैनात करणे आपल्या दृष्टीने चांगले नाही, पण याबाबत सहाव्या जागेचा मास्टरस्ट्रोक मारणाऱ्यांना ना खंत ना खेद! ते राजकीय विजयाच्या नशेत चूरचूर झाले आहेत. कश्मीर खोऱ्यात हिंदूंच्या रक्ताचे सडे पडत आहेत, पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्या सुरू आहेत. हे त्या पाकड्यांचे अतिक्रमण आहे, तर तिकडे लेह-लडाखमध्ये चीनचे आक्रमण सुरू आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
‘गुजरात रेजिमेंट’च्या तोंडावर चिकटपट्ट्याच
“महाराष्ट्र-हरयाणात राज्यसभेच्या जास्त जागा जिंकल्याने हे सीमेवरचे शत्रू मागे हटणार आहेत काय? जिथे जिंकायला हवे तेथे हातभर शेपूट आत घालायचे, पण राज्यसभा, विधान परिषद निवडणुकांचे विजयोत्सव साजरे करायचे हेच यांचे राष्ट्रीय धोरण दिसते. ‘ईडी’, सीबीआयचा धाक राजकीय विरोधकांना दाखवला जातो. त्या धाकाने लडाखच्या सीमेत घुसलेले चीन मागे हटणार आहे काय? तसे होत असेल तर तेही करून बघा. लडाखमध्ये चीन अशा प्रकारे घुसून बसला आहे की, ‘गुजरात रेजिमेंट’च्या तोंडावर याबाबत कायमच्या चिकटपट्ट्याच लागल्या आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा व स्वाभिमानाचा विषय आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
त्यावर बुलडोझर कधी फिरणार?
“मोहम्मद पैगंबरांचा अवमान भाजपा प्रवक्त्याने करताच संपूर्ण देशभरात मुसलमान समाज निषेध व धिक्काराच्या घोषणा करीत रस्त्यावर उतरला. कानपूर, दिल्ली, प्रयाग राजसारख्या शहरांत त्यावरून दंगे उसळले. ते सर्व दंगलखोर मुसलमान होते. त्यांच्यावर हजारोंच्या संख्येने गुन्हे दाखल करून अटका झाल्या व त्या दंगलखोरांच्या घरादारांवर, दुकानांवर लगेच बुलडोझर फिरवून सूड घेण्यात आला. हेच बुलडोझर लडाखच्या हद्दीत चीनने जे बेकायदेशीर रस्ते, पूल, इमारती उभ्या केल्या, त्यावर कधी फिरणार?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.
चीनने बेकायदा बांधकाम केले म्हणून रागाने…
“चीनने लडाखमध्ये जे बांधकाम मोठय़ा प्रमाणावर केले आहे त्यावर ज्या दिवशी हे राष्ट्रीय स्वाभिमानाचे बुलडोझर फिरवले जातील, तेव्हाच आजचे राज्यकर्ते ‘मास्टरस्ट्रोक’ मारणारे हिंमतबाज आहेत हे सिद्ध होईल. दुबळ्यांना चिरडायचे व शक्तिमान लाल चिन्यांपुढे नरमाईने वागायचे यास काय म्हणायचे? एकंदरीत आपल्या अंतर्गत व राष्ट्रीय सुरक्षेचा हा असा खेळखंडोबाच सुरू आहे. चीनने लडाखमध्ये तैनात केलेली जेट विमाने २५ मिनिटांत दिल्लीच्या दिशेने झेपावतील तरी आपले नवे बादशहा सांगतील, ‘‘दिल्ली अभी दूर है।’’ किंवा चीनने बेकायदा बांधकाम केले म्हणून रागाने चांदनी चौकात किंवा जामा मशीद परिसरात बुलडोझर पाठवतील,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.
त्यांचे उडणे देशाला खाली पाडेल
“देशाला राष्ट्रभक्तीचे धडे देणाऱ्यांच्या दिव्याखाली आणि बुडाखाली हा असा अंधारच अंधार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या विजयाने अकलेचे दिवे पाजळले हे खरे, पण कश्मीरातील हिंदूंच्या रक्ताचे पाट त्यामुळे थांबणार नाहीत व लडाखमध्ये घुसलेला चीनही मागे हटणार नाही ही वस्तुस्थिती आहे. अर्थात विजयाचा मास्टरस्ट्रोक राज्यसभेत मारल्याने व तो ‘स्ट्रोक’ दिल्ली दरबारी पोहोचल्याने चिन्यांसाठी ‘दिल्ली बहोत दूर है’ या नशेतच चाणक्य मंडळ तरंगते आहे. विजयाच्या नशेबाजीत ते उडत आहे. त्यांचे उडणे देशाला खाली पाडेल. चीनने लडाखच्या हद्दीत एअरबेस बनवला हे समजूनही जे लोक फक्त घडामोडींवर नजर ठेवून आहेत, त्यांच्या नजरेत बेफिकिरीचा मस्तवाल वडसच वाढला आहे,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.

Leave a Reply