आजीच्या अस्थिविसर्जनाला गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

भंडारा : १४ जून – वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आजीच्या अस्थींचं विसर्जन करण्यासाठी गेला असताना हा अपघात झाला. आजीपाठोपाठ नातवाचाही मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेत 25 वर्षीय युवकाला प्राण गमवावे लागले. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील वैजेश्वर घाटात हा प्रकार घडला आहे.
प्रशांत धोंडबाजी ठाकरे (वय २५ वर्ष, रा. आंबोली, ता. चिमूर, जिल्हा चंद्रपूर) असे बुडून मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. प्रशांतच्या आजी मैनाबाई मनिराम पोटे (रा आंबोली) यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यामुळे प्रशांत आज (सोमवार) सकाळच्या सुमारास आजीचे अस्थी विसर्जित करण्यासाठी पवनी येथील वैनगंगा नदीच्या वैजेश्वर घाटावर आला होता.
अस्थी विसर्जन झाल्यावर आंघोळ करण्यासाठी तो नदी पात्रात उतरला. मात्र तेव्हा खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान त्याचा मृतदेह न सापडल्याने याची माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली. रेस्क्यू टीमकडून शोध सुरु करण्यात आला. त्यानंतर 3 तासाने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
फिर्यादी रघुनाथ गजानन पोटे (35) रा सिरपुर, ता उमरेड यांच्या तक्रारीवरून पोलिसात नोंद करण्यात आली असून मृतक प्रशांत याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. अधिक तपास पवनी पोलिस करीत आहेत.

Leave a Reply