राज्याच्या हितासाठी अजित पवार यांनी पुन्हा भाजपसोबत यावे – राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर : १३ जून – भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांनी पुन्हा सोबत येण्याची साद घातली आहे. राज्याच्या हितासाठी अजित पवार यांनी पुन्हा भाजपसोबत यावे, अशी इच्छा विखे पाटील यांनी व्यक्त केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, हा अजूनही राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय असतो. तर मुख्यमंत्री शांत संयमी असून चुकीच्या सल्लागाऱ्यांच्या गराड्यात सापडले असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्कर श्रोत्री यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत विखे पाटलांनी मनमोकळ्या गप्पा मारताना अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली आहेत. नेत्यांचे गुणविशेष आणि सल्ला याप्रश्नावर अजित पवारांनी पुन्हा भाजपा सोबत येण्याची साद विखे पाटील यांनी घातली.
तर राज्याचे मुख्यमंत्री शांत संयमी असून चुकीच्या सल्लागारांच्या गराड्यात सापडले असल्याचं विखे पाटील यानी म्हटलं आहे. राजकीय विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांना मात्र त्यांनी दुर्लक्षित केल्याचं बघायला मिळालं.
अनेक वर्षांपासून काँग्रेसचे नेते असलेल्या विखे कुटुंबाला मुलगा सुजय विखे याच्या खासदारकी साठी 2019 साली भाजपात प्रवेश करावा लागला. यावेळी त्यांचे मार्गदर्शक असलेले वडिल बाळासाहेब विखे मात्र हयातीत नव्हते. अशावेळी घेतलेला हा पहिला निर्णय राजकारणाला कलाटणी देणारा आणि योग्य असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं.
महाविकास आघाडीमुळे राज्यातील शेतकरी, सामान्य माणूस अगदी त्रासलेला आहे. यातून जर बाहेर पडायचं असेल तर राज्यात भाजपाची सत्ता येणं आवश्यक आहे आणि तेच ध्येय असल्याचं विखे पाटील म्हणालेत.

Leave a Reply