फेसबुक लाईव्ह करतांना रवी राणा हनुमान चालीसा विसरले, नेटकऱ्यांच्या टीकेनंतर केला व्हिडीओ डिलीट

अमरावती : १३ जून – राज्यात एकीकडे निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय खळबळ सुरू असताना दुसरीकडे हनुमान चालीसावरून मोठं राजकारण तापलं आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा चंग बांधला आणि राज्यभरात रान उठलं. मात्र, रवी राणा यांनाच हनुमान चालीसा पाठ नसल्याने ते सध्या नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी बनले आहेत.
रवी राणा हे हनुमान चालीसा बोलताना विसरले त्यामुळे फेसबुक लाइव्ह पोस्ट डिलीट करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत असलेले आमदार रवी राणा यांनी निवडणुकीचा विश्लेषण करण्यासाठी फेसबुक लाईव्ह केलं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच चिखलफेक केली. दरम्यान, हनुमान चालीसामधील काही ओळींचा संदर्भ देताना राणा एक-दोनदा नव्हे तर अनेकदा चुकले. त्यांचे उच्चारही व्यवस्थित निघत नसल्याचे बघून नेटकऱ्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
मात्र, काही काळानंतर आमदार रवी राणा यांना ही पोस्ट डिलीट करण्याची नामुष्की ओढवली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Leave a Reply