पीआयएफ प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नागपूर : १३ जून – ‘समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडियाच्या (पीआयएफ) प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर आहे. अन्य संघटनांवरही वॉच ठेवण्यात येत आहे’, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांना दिली. सिव्हिल लाइन्समधील रविभवन येथे रविवारी गृहमंत्र्यांनी शहर व जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर गुप्तचर विभागांनी राज्यात दंगल होण्याची शक्यता वर्तविली. याबाबत पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना खबदारीसह उपाययोजना आखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांनी जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्व समाजांतील धर्मगुरू व सामाजिक कार्यकर्त्यांशी समन्वय साधला. त्यामुळे राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असे वळसे यांनी सांगितले. अल कायदाच्या धमकीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, ‘पोलिस विभाग व गुप्तचर यंत्रणा ‘अलर्ट’ आहे. राज्यातील सर्वच संवेदनशील ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येत असून, या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी सुरू केलेली तंटामुक्त गाव योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.’
नागपूर कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांच्या मृत्यूबाबत अनेक आरोप करण्यात येत आहेत. लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना नागपुरात पाठविण्यात येईल. त्यांच्याकडून कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात येऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. मुसेवाला हत्याकांडाचे तार पुण्यातील सिद्धेश कांबळे याच्याशी जुळले आहेत. या प्रकरणात चार ते पाच राज्यांतील पोलिस तपास करीत असून, प्रकरण संवेदनशील आहे, असेही दिलीप वळसे म्हणाले.

Leave a Reply