देवेंद्र भुयारांवर केलेल्या आरोपावरून संजय राऊतांच्या यु-टर्न

मुंबई : १३ जून – मागील काही दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राज्यसभा निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पराभवाचं खापर अपक्ष आमदारांवर फोडलं. अपक्ष आमदारांनी आम्हाला मतं दिली नसल्याने आमचा पराभव झाला, असा थेट आरोप राऊतांनी केला होता. यावेळी त्यांनी काही अपक्ष आमदारांची नावं देखील घेतली होती. यामध्ये अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचं नाव होतं.
संजय राऊत यांच्या आरोपानंतर देवेंद्र भुयार यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे. तसेच आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. याप्रकरणी ते आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यानंतर आता संजय राऊतांनी आपल्या आरोपावरून यू-टर्न घेतल्याचं दिसून आलं आहे.
संबंधित आरोपांबाबत बोलताना राऊत यांनी म्हटलं की, “देवेंद्र भुयार मला भेटले. मी त्यांची भूमिका ऐकली, त्याचं म्हणणं ऐकलं. ते प्रामाणिकपणे बोलत होते, एवढंच मला वाटलं. त्यांच्या ज्या भावना आहेत, ते मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. त्यांच्याशी बोलताना वाटलं की ते खरं बोलत आहेत,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
दुसरीकडे, संजय राऊतांनी थेट अपक्ष आमदारांची नावं घेतल्याने राज्यसभा निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “त्या माणसाला काय कळतं, त्यांनी नावापुढे डॉक्टर लावलं आहे, याची आधी चौकशी होणं गरजेचं आहे.”

Leave a Reply