ताजा कलम – ल.त्र्यं. जोशी

मुख्यमंत्र्यांचे मौन ?

महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठवावयाच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन छत्तीस तास उलटून गेल्यानंतरही,
(हा मजकूर मी रविवारी रात्री दहा वाजता लिहित आहे ) मविआचे नेते मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून औपचारिक वा अनौपचारिकपणे एका शब्दाचीही प्रतिक्रिया न आल्याने राज्याच्या राजकारणात प्रश्नचिन्ह निर्माण झाले असेल तर ते अतिशय स्वाभाविक आहे.या निवडणुकीत शिवसेनेचा एक उमेदवार पराभूत झाल्याचा मुख्यमत्र्याना धक्का बसला असेल तर ते अतिशय स्वाभाविक आहे.पण निवडणूक म्हटल्यानंतर असे काही होणारच, हे समजून घेण्याइतका राजकारणाचा अनुभव मुख्यमंत्र्याना निश्चितच आहे.शिवाय त्यानी आतापर्यंत अनेक पराभव पचविले आहेत.त्यामुळे त्यांच्या मौनाचे गांभीर्य अधिकच वाढते.विशेषतः मविआचे शिल्पकार शरद पवार, राष्ट्रवादी व काॅग्रेसचे नेते एवढेच नाही तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याही प्रतिक्रिया आल्यानंतर मुख्यमंत्र्यानी या विषयावर एक शब्दही उच्चारू नये हे एक आश्चर्यच आहे.संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेची गरज काय, असा प्रश्न निर्माण होत असला तरी शेवटी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख यांच्या प्रतिक्रियेचे एक वेगळे महत्व आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मौनाचा प्रश्न निर्माण होणे क्रमप्राप्तच आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या मौनाचा एक अर्थ तर निश्चितच आहे की, त्याना या अनपेक्षित निकालांचा धक्का बसला आहे.कारण एक तर त्यांच्याच नेतृत्वाखाली मविआने या निवडणुकीतील व्यूहरचना केली होती. ते स्वतः मविआच्या सर्व आमदारांशी सामूहिकपणे वा काहीशी व्यक्तिगत बोलले होते.तरीही हा पराभव व्हावा व तोही शिवसेना उमेदवाराच्याच नशिबी यावा, ही मुख्यमंत्र्याना अस्वस्थ करणारी बाब आहे, याबाबतीत दुमत होण्याचे कारण नाही.पण त्यामुळेच त्यांच्या मौनाचे महत्व रहस्यात रूपांतरित होते.त्यामुळेच त्याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त होण्याची शक्यता आहे.तिचा राज्यातील स्थिरतेशीही स्वाभाविकपणे संबंध पोचू शकतो.म्हणूनच ते रहस्य लवकरात लवकर उलगडले पाहिजे,अशी अपेक्षा अवाजवी ठरू नये.
निवडणूक निकालात बहुसंख्य आमदारांनी मविआ उमेदवारानाच मतदान केल्याने सरकारच्या विधानसभेतील बहुमताबद्दलही प्रश्न निर्माण होत नाही आणि किमान वैधानिक पातळीवर तरी सरकारच्या स्थिरतेचा प्रश्न निर्माण होत नाही.पण आपली नैतिकता शाबूत राखण्यासाठी मुख्यमंत्री जनतेच्या दरबारात विश्वास मागण्यासाठी तर जाऊ इच्छित नाहीत अशी शंका निर्माण होते. मुख्य मंत्र्यांच्या या मौनामुळे ‘ वरूनी शांत हा गिरी, धुमसते आग परी अंतरी’ या काव्यपंक्तीची सहजच आठवण होते.तसे जर असेल तर ते राज्याच्या स्थैर्यासाठी धोकादायक ठरू शकते.म्हणूनही मुख्यमंत्र्यानी मौन सोडले पाहिजे ही अपेक्षा समोर येते.

ल.त्र्यं. जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर

Leave a Reply