उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडावे आणि राजीनामा द्यावा – रामदास आठवले

जळगाव : १३ जून – राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तर, राज्यसभेच्या एका जागेवर झालेल्या पराजयामुळे उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडावं आणि राजीनामा द्यावा, अशी मागणीच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर आले होते. रामदास आठवले हे आज मुक्ताईनगर येथे प्रसिद्ध गायक स्वर्गीय प्रतापसिंग बोदडे यांच्या अभिवादन सभेसाठी आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत असताना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणीच करून टाकली.
लोकशाहीमध्ये एका मताला फार मोठं महत्व असतं, एका मताने अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार हरलं होतं, नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्षांची मतं भाजपच्या पारड्यात पडलेली आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांना आता सत्तेवर राहण्याचा काही अधिकार नाही, त्यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिला पाहिजे, सत्तेतून त्यांनी बाहेर पडले पाहिजे,अशी आमची त्यांना सूचना आहे, असं आठवले म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी फार मोठी प्रतिष्ठा कमावली होती. परंतु या निवडणुकीमुळे त्यांची प्रतिष्ठा त्यांनी गमावली आहे आणि महाविकास आघाडीचा पूर्ण देशांमध्ये मोठा अपमान झाला आहे, अशी खोचक प्रतिक्रियाही आठवले यांनी दिली.

Leave a Reply