संपादकीय संवाद – आंतरराष्ट्रीय दलालांच्या बहकाव्यात येऊन धार्मिक संघर्ष होऊ न देणे गरजेचे

भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्ली स्थित भाजप नेते नवीन जिंदाल यांच्याविरोधात सध्या देशात आणि देशाबाहेर जे वादळ उठले आहे, ते बघता यामागे काहीतरी आंतरराष्ट्रीय षडयंत्र असावे, अशी शंका घेण्यास निश्चित वाव आहे. वस्तुतः नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबराविरुद्ध भावना दुखावणारी कथित विधाने केल्याचे लक्षात येताच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई केली होती, तरीही देशभर सुरु असलेली आंदोलने आणि अनेक ठिकाणी त्याने घेतलेले हिंसक स्वरूप बघता हे प्रकरण घडत नसून घडवले जात आहे, अशी शंका निश्चित मनात येते.
नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी जे काही केले, त्याचे पंचनामाला समर्थन करायचे नाही, मात्र असे प्रकार आज प्रथमच घडत आहेत असे नाही, अन्यधर्मीयांच्या श्रद्धास्थानांवर अश्या प्रकारे टीका करण्याचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत, योग्य स्तरावर त्याचा निषेधही होतो, मात्र या प्रकारात काहीतरी वेगळेच घडलेले आहे, नुपूर शर्मा जे काही बोलल्या त्यातून सर्वच्या सर्व भाग न दाखवता काही प्रक्षोभक वाक्य घेऊनच एक व्हिडीओ बनवला गेला, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आला. त्यानंतर जगभरातील मुल्सिम राष्ट्रांनी त्याचा निषेध केला, तिथल्या भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यापर्यंत मजल गेली. त्या देशातील भारतीय राजदूतांना बोलावून समाज देण्याचेही प्रकार घडले. हा सर्व घटनाक्रम बघता, भारत सरकार आणि भारतीय जनता पक्ष, यांनी योग्य ती पाऊलेही उचलली, शर्मा आणि जिंदाल यांच्यावर कारवाई कंरण्यात आली. इथे हे प्रकरण थांबायला हवे होते.
मात्र त्या नंतर भारतात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. गावागावात ही आंदोलने हिंसक वळणही घेत आहेत. यात सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचे नुकसान तर होत आहेच शिवाय पोलीस प्रतिकारात काही आंदोलक जखमी झाल्याचीही माहिती आहे. ठिकठिकाणीच्या पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. हे सर्व बघता भारतात धार्मिक विद्वेष वाढवून सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचा कट आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जात असल्याची शंका येते आहे.
जेव्हापासून भारतात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तारूढ झाले, तेव्हापासून अनेक मुस्लिम राष्ट्रे दुखावलेली आहेत, असे असले तरी मोदींना जनतेचा असलेला पाठिंबा वाढतच आहे, विशेषतः मुस्लिम समाजाच्या बाबतीत त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे २०१९ च्या निवडणुकीत मुस्लिम महिलांनी मोठ्या प्रमाणात मोदींच्या नावावर मतदान केल्याची चर्चा होती, हे सर्व बघता भारतात धार्मिक संघर्ष वाढवून अशांतता निर्माण करण्याचा हा आंतरराष्ट्रीय कट असल्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब होते आहे.
अश्या परिस्थितीत सर्वच भारतीयांनी सामंजस्याने वागण्याची गरज आहे. आतंरराष्ट्रीय कटाचे दलाल असलेले अनेक नेते जनसामान्यांना भडकवण्याचे प्रयत्न करतात्त, मात्र सर्वसामान्य जनतेने कुणाच्याही बहकाव्यात न यता साधक बाधक विचार करून संघर्ष टाळावा, इतकेच इथे सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply