फटका बसण्याची शक्यता भाजपाला, धनंजय महाडिक की अनिल बोंडे लवकरच स्पष्ट होईल – अमोल मिटकरी

अकोला : १० जून – राज्याच्या राजकीय वर्तुळात आज जोरदार चर्चा आहे ती राज्यसभा निवडणुकीची. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अखेर २४ वर्षांनंतर आज राज्यात पुन्हा राज्यसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून निरनिराळे दावे केले जात आहेत. विशेषत: सहाव्या जागेवर नेमका कोणता उमेदवार निवडून येणार? याची देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या असताना त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या अध:पतनाचा इशारा दिला आहे.
आज सर्वच पक्षांकडून गटागटाने आमदार विधानभवनात येऊन मतदान करत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मतांचा कोटा ४२ वरून ४४ केल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, शिवसेनेच्या नाराजीनंतर त्यांनी पुन्हा निर्णय बदलून तो ४२ केल्याचं देखील सांगितलं जात होतं. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली होती. मात्र, यावर बोलताना अमोल मिटकरींनी पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
“महाविकास आघाडी सरकारमध्ये आज चारही जागेवर आमचे उमेदवार निवडून येतील. भाजपाकडून काही बातम्या पेरल्या जात आहेत की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वितुष्ट आहे. त्यात कोणतंही तथ्य नाही. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी नव्या जोमाने हे उमेदवार उभे केले आहेत. ते निवडून येतील”, असं मिटकरी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान, आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने चंद्रकांत पाटलांचं नाव घेत मिटकरींनी खोचक टोला लगावला आहे. “फटका बसण्याची शक्यता भाजपाला आहे. चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज फटका कुणाला बसणार? धनंजय महाडिक की अनिल बोंडे हे स्पष्ट होईल. भाजपाच्या अध:पतनाला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानमित्त सुरुवात झाली असं मी समजतो”, असं मिटकरी म्हणाले.

Leave a Reply