झोपी गेलेल्या या सैतानाला भाजपाने जागे करण्याचे काम केले – अल-कायदा च्या धमकीवरून शिवसेनेची भाजपवर टीका

मुंबई : १० जून – प्रेषित मोहम्मद यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:ला उडवून देण्यासाठी तयार आहोत असं म्हणत भारतातील अनेक शहरांमध्ये आत्मघाती हल्ल्यांची धमकी देणाऱ्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यासंदर्भात शिवसेनेनं चिंता व्यक्त केलीय. अल-कायदा इन द सबकॉन्टीनंट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेनं गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघाती हल्ले करण्याचा इशारा दिल्यानं शिवसेनेनं झोपी गेलेल्या या सैताना भाजपाने जागं करण्याचं काम केलंय, अशी टीका केली आहे. तसेच अशाप्रकारे हल्ले झाले आणि त्यात सर्वसामान्यांचे बळी गेले तर त्यासाठी भाजापा पूर्णपणे जबाबदार असेल असंही शिवसेनेनं म्हटलंय.
निरपराध लोकांचे रक्त सांडलेच तर त्याची सर्वस्वी जबाबदारी भाजपाची
“अल कायदाने महाराष्ट्रासह देशभरात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची धमकी दिली आहे. भारतीय जनता पक्षाने मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत जे अपमानकारक वक्तव्य केले, त्यामुळे ‘अल कायदा’सारख्या संघटनांनी सरळ धमक्या द्यायला सुरुवात केली. देशातील अनेक शहरांत आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवू असे ‘अल कायदा’चे इशारे आहेत. ‘अल कायदा’ची धमकी ही भारतीय जनता पक्षाने ओढवून घेतलेली बला आहे. झोपी गेलेल्या सैतानाला जागे करण्याचे काम भाजपाने केले आहे व उद्या मुंबई-महाराष्ट्रात ‘अल कायदा’ने काही विध्वंसक कृत्य केले व त्यात निरपराध लोकांचे रक्त सांडलेच तर त्याची सर्वस्वी जबाबदारी भारतीय जनता पक्षाची राहील,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
ही धमकी गांभीर्याने घेण्याची गरज
“मोहम्मद पैगंबरांविषयी ज्या प्रकारचे वक्तव्य भाजपातर्फे करण्यात आले, त्याचे समर्थन कोणीच करू नये. दुसऱ्या धर्मप्रमुखांचा असा अपमान हिंदुत्वासाठी मान्य नाही; पण भाजपाला असे वाटते की, ते म्हणजेच देश व ते म्हणजेच हिंदुत्व. आज पैगंबर अपमानप्रकरणी भारत देशावर माफीची नामुष्की तर ओढवलीच, पण ‘अल कायदा’सारख्या संघटनांनी दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. ही धमकी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मोहम्मद पैगंबरांच्या एका व्यंगचित्रावरून फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ले झाले व त्याचे पडसाद मुंबईसह देशभरात उमटले,” अशी आठवणही शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून करुन दिली.
ज्या सडक्या मेंदूच्या महिला प्रवक्त्याने
“एका बाजूला कश्मीर पेटले आहे. तेथे अतिरेक्यांकडून हिंदू रक्ताचे सडे पाडले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला ‘अल कायदा’ने दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर आपल्या लाडक्या मोदी सरकारने खबरदारीची योजना म्हणून काय करावे? ज्या सडक्या मेंदूच्या महिला प्रवक्त्याने मोहम्मद पैगंबरांचा अपमान केला, त्या महिलेची सुरक्षा व्यवस्था वाढवली,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.
“धोका देशाला आहे, भाजपला नाही हे त्यांना कोणी सांगायचे? गरळ ओकणाऱ्या महिला प्रवक्त्यास ‘झेड’ सुरक्षा पुरवल्याने ‘अल कायदा’चे हल्ले रोखले जातील काय? पुन्हा त्या महिला प्रवक्त्याच्या भयंकर वक्तव्याचे खुले समर्थन कंगना राणावत या नटीने केले. भाजपाने किती सडक्या कांद्यांना पदरी बाळगले आहे हेच त्यातून पुन्हा दिसले. उद्या देशात दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरू झालीच तर जनतेच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय योजना केली आहे? मोदी, शहा वगैरे प्रमुख नेत्यांना सुरक्षेचे अभेद्य कवच आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यांचे बालबच्चेही त्याच सुरक्षेच्या पिंजऱ्यात सुखरूप राहतील, पण उद्या ‘अल कायदा’सारख्यांनी सार्वजनिक ठिकाणी घातपाती कृत्ये घडवलीच तर सामान्य जनतेच्या जिवाची शाश्वती काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.
पंतप्रधान व गृहमंत्री कोणताही खुलासा करायला तयार नाहीत
“विमानतळ, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, गर्दीच्या बाजारपेठा अतिरेक्यांचे लक्ष्य ठरतात हा आजपर्यंतचा अनुभव आहे. ‘‘आमच्या प्रेषितांचा अपमान करणाऱ्यांना उडविण्यासाठी आमच्या शरीरावर स्फोटके बांधू. या चुकीसाठी कोणतीही माफी, कोणतीही सुरक्षा व्यवस्था त्यांना वाचवू शकणार नाही,’’ अशी धमकी ‘अल कायदा’ने दिली. म्हणजे सामान्य जनतेच्या डोक्यावर धोक्याची तलवार लटकू लागली आहे. भाजपामुळे देशाची जगात नामुष्की तर झालीच, पण देशातील जनतेच्या जिवाशी खेळ सुरू झाला. आधीच ती महागाई, बेरोजगारीमुळे मरते आहे. त्यात आता आत्मघातकी हल्ल्यांचे भय. सरकार काय करते? सरकार फक्त आपल्या गोटातील लोकांना सुरक्षा पुरवते. पैगंबरांच्या अपमानासंदर्भात देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री कोणताही खुलासा करायला तयार नाहीत,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.
सूत्रधार पूर्णवेळ सत्तामग्न व निवडणूकमग्न
“भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर अपमानित होण्याची वेळ आली. हा प्रश्न हिंदू-मुसलमानांचा नाही, तर हिंदूंच्या सहिष्णुतेचा आहे. निदान याप्रश्नी सरसंघचालक मोहन भागवत यांनी तरी परखड भूमिका घ्यायला हवी, पण एरवी बोल बोल बोलणारेही येथे गप्प बसले आहेत. बाबरी प्रकरणानंतर मुंबईत बॉम्बस्फोट घडवून रक्तपात केला गेला. त्या जखमांचे व्रण आजही भळभळत आहेत. आता हे नवे प्रकरण उपटले आहे. ही आग शांत करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. पंजाबात खलिस्तानच्या घोषणा व झेंडे फडकविण्याचे धंदे सुरू झाले आहेत. कश्मीरात तर वणवाच पेटला आहे. या दोन्ही तणावांवर सरकारला तोडगा काढणे जमत नाही. केंद्रातील सरकार व त्यांचे सूत्रधार पूर्णवेळ सत्तामग्न व निवडणूकमग्न झाले आहेत,” असा टोला पंतप्रधान मोदींचं थेट नाव न घेता शिवसेनेनं लागवलाय.
…तर हे अंधभक्त बिळातच लपतील
“निवडणुका जिंकणे याशिवाय त्यांना दुसरे काहीच सुचत नाही. उद्या ‘अल कायदा’ने त्यांची धमकी दुर्दैवाने खरी करून दाखवलीच तर तेथेही राजकारण करतील व त्या बॉम्बस्फोटांना हिंदू-मुसलमान असा रंग देऊन निवडणुकांत मते मागतील. राजकारण हे असे खालच्या पातळीवर गेले आहे. भाजपाचे हिंदुत्व हे इतरांच्या धर्मद्वेषावर आधारित आहे. भाजपाचे हिंदुत्व फाळणीस निमंत्रण देणारे व धार्मिक तणावातून राजकीय स्वार्थ साधणारे आहे. भाजपाचे हिंदुत्व लोकांना अंधभक्त बनवून दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला लावणारे आहे. या विषाच्या घोटाने देश तडफडला तरी त्यांना पर्वा नाही. मोहम्मद पैगंबरांच्या अपमान प्रकरणात भाजपाला हवा असलेला धार्मिक द्वेष व उन्माद दोन्ही निर्माण झाले. त्या उन्मादाचा उत्सव करायला अंधभक्त आहेतच, पण ‘अल कायदा’ची धमकी देशावर उलटली तर हे अंधभक्त बिळातच लपतील. हिंदूंचे मात्र नाहक बळी जातील,” अशी भीती शिवसेनेनं व्यक्त केलीय.

Leave a Reply