जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांचे मत वैध, निवडणूक आयोगाने फेटाळला भाजपचा आक्षेप

मुंबई : १० जून – राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. मविआनं अपक्ष आमदार आणि लहान पक्षांना आपल्याकडे वळवल्यानं त्यांचं पारडं जड मानलं जात आहे. तर मविआच्या एखाद्या आमदाराचं मत कमी कसं होईल, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचं मत बाद ठरवलं जावं, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र भाजपनं घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. त्यामुळे मविआला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या प्रकरणी भाजप केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेण्यात येणार असल्याचं समजतं.
राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे पोलिंग एजंट मतदानाच्या ठिकाणी बसले आहेत. त्यांच्याकडून मतदानप्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे. भाजपचे पोलिंग असलेल्या पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांचे मत बाद ठरवण्याची मागणी केली आहे. राज्यसभा निवडणुकीची मतपत्रिका भरल्यानंतर संबंधित आमदाराने आपल्या गटाच्या नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपत्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती त्यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. त्यामुळे या दोन्ही आमदारांची मतं बाद ठरवण्यात यावीत, अशी मागणी पराग अळवणी यांनी केली.
राज्यसभा निवडणुकीसाठी विधिमंडळात सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांकडून ठरलेल्या रणनीतीनुसार टप्याटप्प्यानं मतदान केलं जात आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत बहुतांश आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मतदान केलं आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि अपक्ष आमदार रवी राणा यांचं मतदान अद्याप शिल्लक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आपापल्या उमेदवारांसाठी राखून ठेवण्यात आलेला निर्धारित कोटा वाढवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीची चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply