शिवसेनेचे हिंदूत्व हृदयात राम, हाताला काम देणारे आणि हिंदूत्वाचे रक्षण करणारे – उद्धव ठाकरे

औरंगाबाद : ९ जून – भाजपच्या प्रवक्त्यांमुळे जगात देशाची बदनामी झाली़ दुसरीकडे, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था संकटात असून, लोक महागाईत होरपळत आहेत. त्यामुळे कुठे नेऊन ठेवणार देश माझा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी भाजपवर टीकास्त्र सोडले.
औरंगाबाद शिवसेनेच्या ३७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित स्वाभिमान सभेत ते बोलत होते. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या सभेत ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपला लक्ष्य केल़े
शिवसेनेचे हिंदूत्व हृदयात राम, हाताला काम देणारे आणि हिंदूत्वाचे रक्षण करणारे असल्याचा पुनरुच्चार करत ठाकरे यांनी हिंदूत्वाची मोजपट्टी तुमच्या हातात कोणी दिली, असा सवाल भाजपला केला़ भाजपकडून भोंगे, हनुमान चालिसा आणि थडग्यांवर नतमस्तक होण्यासाठीही सुपाऱ्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहराचे नामांतर संभाजीनगर होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केल़े
‘‘काश्मिरी पंडित घर सोडून निघून जात आहेत. त्यांना हवी ती मदत करायला महाराष्ट्र सरकार तयार आहे. पण, चांगले काम करणाऱ्यांच्या मागे ‘ईडी’ आणि सीबीआयचा ससेमिरा लावला जातो. खरेच काही वाटत असेल तर तिकडे काश्मिरात तपास यंत्रणांचा उपयोग करा’’, असे ठाकरे म्हणाल़े
२०१४ पासून राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार होते. त्याकाळात औरंगाबादचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी निधी का दिला नाही, असा सवाल करत आता जलआक्रोश मोर्चा काढणाऱ्या भाजपला ठाकरे यांनी लक्ष्य केले. हा औरंगाबादच्या पाणीप्रश्नासाठी नव्हे तर सत्ता गेल्याचा आक्रोश करणारा मोर्चा होता, अशी टीका ठाकरे यांनी केली. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल आणि कंत्राटदार काम करत नसेल तर हातात दंडुका घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना दिल्या असल्याचे सांगत रस्ते, सफारी पार्क, पर्यटन विकास यांसह विकासकामांवर सरकार अधिकाधिक लक्ष देत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. पण, कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना हे सरकार अडीच वर्ष चालल़े यामुळे भाजपचे नेते बिथरले आहेत. त्यातूनच ईडी, सीबीआयच्या कारवाया अगदी कुटुंबीयांवरही केल्या जात आहेत, असे ठाकरे म्हणाल़े
हिंदूुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. पण, मुस्लिमांचा द्वेष करणे आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले नाही. पण, भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांनी कारण नसताना प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाष्य केल्याने जगात भारतावर नामुष्की ओढवली, याबद्दल ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. त्याचबरोबर या प्रकरणामुळे देशाच्या पंतप्रधानांचे छायाचित्र कचरापेटीवर लावले गेले याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अर्जून खोतकर यांचीही समयोचित भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन आमदार अंबादास दानवे यांनी केले.
‘राज्यात गुंतवणुकीत वाढ’
राज्यातील गुंतवणुकीत मोठी वाढ होत आहे. महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर पुढे जात आहे, हे पाहावत नाही. त्यामुळे ईडी- सीबीआयचा ससेमिरा लावला जात आहे. पण, येत्या काळात राज्यात मोठे उद्योग येतील. औरंगाबादमध्येही मोठा प्रकल्प येणार असल्याचे या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
‘भाजपची भूमिका ही देशाची भूमिका नव्हे’
भाजप प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की ओढवली़ मात्र, भाजप किंवा त्याच्या प्रवक्त्यांची भूमिका ही देशाची भूमिका नाही, असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितल़े ज्या पद्धतीने भाजपचे काम सुरू आहे, तेच रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अपेक्षित होते काय, असा सवालही ठाकरे यांनी केला़

Leave a Reply