लडाखनजिक सुरू असलेल्या चीनच्या कारवाया धोकादायक – अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याचा इशारा

नवी दिल्ली : ९ जून – लडाखनजिक सुरू असलेल्या चीनच्या कारवाया ‘डोळे उघडणाऱ्या’ असून, तो देश ज्या पायाभूत सुविधा उभारत आहेत त्यापैकी काही धोकादायक आहेत, असे अमेरिकेच्या एका उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे.
हिमालय आघाडीवर चीनच्या पायाभूत सुविधा उभारणीबद्दल बोलताना यूएस आर्मी पॅसिफिकचे कमांडिंग अधिकारी जनरल चार्ल्स फ्लिन यांनी चीनच्या वर्तणुकीचे वर्णन ‘अस्थैर्य निर्माण करणारे व संक्षारक (करोझिव्ह)’ असे केले.
चीनच्या कारवायांचा स्तर डोळे उघडणारा आहे. पश्चिम थिएटर कमांडमध्ये उभारल्या जाणाऱ्या काही सुविधा धोकादायक आहेत. आणि ते ज्या प्रमाणात लष्करी शस्त्रागार उभारत आहेत ते कशासाठी असा प्रश्न कुणालाही पडेल’, असे आशिया- प्रशांत क्षेत्राची जबाबदारी असलेल्या फ्लिन यांनी निवडक पत्रकारांशी बोलताना सांगितले. चीनच्या या अस्थैर्यकारक व संक्षारक कारवायांना तुल्यभार म्हणून आपण एकत्र काम करणे आवश्यक असल्याचे मला वाटते, असेही फ्लिन म्हणाले. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात युद्धाभ्यासाचा भाग म्हणून भारत व अमेरिका हे हिमालयात ९ हजार ते १० हजार फूट उंचीवर ‘हाय- अल्टिटय़ूड’ प्रशिक्षण सराव करणार आहेत. या सरावाचे नेमके ठिकाण जाहीर करण्यात आलेले नाहीत. यानंतर, भारतीय फौजा अलास्कामधील अशाच प्रकारच्या आत्यंतिक थंड वातावरणात प्रशिक्षण देणार आहेत.हा सराव अतिशय उंचावरील युद्धाच्या परिघातील उच्चस्तरीय संयुक्त मोहिमांचा भाग असणार आहे. यात नवे तंत्रज्ञान, एअर फोर्स अॅस्टेस, अटॅक अॅव्हिएशन, रसद पुरवठा आणि माहितीचे आदानप्रदान यांचा समावेश असेल. ‘भारतीय व अमेरिकी लष्कर ज्यांचा फायदा घेऊ शकतात अशा या अमूल्य संधी आहेत’, असे मत जनरल फ्लिन यांनी व्यक्त केले.

Leave a Reply