रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली रेपो रेटमध्ये वाढ

नवी दिल्ली : ८ जून – महागाई दर वाढल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंटची (०.५० टक्के) वाढ करण्यात आली आहे. यासोबत रेपो रेट ४.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. एक महिन्याच्या अंतराने रेपो रेटमध्ये करण्यात आलेली ही दुसरी वाढ आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती दिली. एमपीसीची सोमवारपासून सुरु असलेली तीन दिवसीय बैठक आज संपली. या आर्थिक वर्षातील एमपीसीची ही तिसरी बैठक होती. शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत समितीच्या पाच सदस्यांनी महागाई आणि आर्थिक विकासावर चर्चा केली. अनियंत्रित महागाई लक्षात घेता रेपो रेट वाढवण्याशिवाय पर्याय नाही यावर सर्व सदस्यांचं एकमत झालं.
याआधी एमपीसीने मे महिन्याच्या सुरुवातीला तातडीने आयोजित केलेल्या बैठकीतून रेपो रेटमध्ये ४० बेसिस पॉइंटची वाढ केली होती. ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली जाईल असा अंदाज आहे. यानंतर हा रेट ५.५० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.
सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ७.८ टक्के होता, जो मे २०१४ नंतर सर्वाधिक आहे. जानेवारी २०२२ पासून हा दर सहा टक्क्यांच्या पुढे आहे. याचप्रकारे एप्रिल २०२२ मध्ये घाऊक महागाई वाढून १५.८ टक्क्यांवर पोहोचला होता. डिसेंबर १९९८ नंतर हा दर सर्वाधिक होता.
धान्याच्या महागाईबद्दल बोलायचं गेल्यास मार्च महिन्यात ७.६८ टक्क्यांवरुन ८.३८ टक्क्यांवर पोहोचला होता. मे महिन्यातील आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान महागाई दर वाढत राहील असा अंदाज आहे. दुसरीकडे सरकराने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पेट्रोल आणि डिझेवरील कर, विमान इंधनाचे दर कमी करण्यासोबतच अनेक पावलं उचलली आहेत.

Leave a Reply