बकुळीची फुलं : भाग ३५ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade२६ जानेवारी तरी दिल्लीतल्या परेड बद्दलल खुप काही ऐकलं होतं . आणि आकाशवाणी वर ऐकल्यानंतर ही परेड पाहण्यासाठी मला उत्सुकता होतीच नेहमीच उत्साही असलेलं मन आता अधीर झालं होतं. त्यावेळी मा. झैलसिंह
राष्ट्रपती होते. आणि मा. इंदिरा गांधी पंतप्रधान.
आईला पत्रांनी कळवलं “आम्ही अशी परेड बघायला राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंत जागा मिळेल तिथे जाणार आहोत” .
आईनी अगदी त्वरित लिहीलं. अगदी एक्स्प्रेस डिलीव्हरी ने पत्र आलं.
” सातवा महिना आहे . गर्दीत जाऊ नकोस. अगदी काही झालं तरीही , त्यातून बसने धक्काबुक्की करत नकोच.”
मी वेडी , अनुभव नसलेली . मी आईच्या नकाराचं पत्र ह्यांना दाखवणार होते ते परत आल्यावर .
मी ते गाडीखाली ठेवलं . ह्यांचे दोन मित्र आणि एका मित्राची बायको ही बरोबर होती.
२६ जानेवारी ऐन भरातली थंडी. ते तिघं जणं आमच्याकडे रात्रीच ब्लॅंकेट वगैरे घेऊन थंडीच्या कपड्यासह आले. एकदा वाटलं आईचं पत्र ह्यांना दाखवावे . पण सर्वांचा अमाप उत्साह आणि आनंद पाहून पुन्हा ते पत्र मनातच ठेवलं .
आणि पहाटे दोन वाजताच , पराठे , भाजी केली. चारच्या सुमारास , शहर जागंच दिसत होतं , चहाच्या टप-या , खाण्याचे लहान मोठे स्टॉल्स सुरू होते. वारा भरारा होता. रिक्षात तर असहनीय होता.
पाण्याच्या बाटल्या घेऊनआणि थंडीचे कपडे घालून, बरोबर घेऊनही निघालो . घरापासून वीस किलोमीटर जायचं होतं . सारखी मनात आई होती . तिची वाक्यं होती.
क्वार्टर पासून मेन गेट पाच मिनिटांच्या अंतरावर होतं . चालतांना प्रचंड थंडीने आणि बोच-या गार वा-याने धाप लागत होती .
गेट बाहेर दोन ऑटो येणार होत्या . ह्यांचा मित्र म्हणाला
” वहिनी, कसलीही काळजी करायची नाही. आम्ही आहोत सोबत . तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. “
मनापासून मला हसू आलं .
परवा बोलतांना ह्यांनी त्या परेडचं उत्साहवर्धक वर्णन केलं होतं. म्हणाले होते,
“इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन पर्यंतचा रस्ता दुतर्फा इतक्या माणसांनी भरून जातो की पाय ठेवायला जागा नसते . प्रत्येक प्रांताच्या झाकी असतात .
भारताबाहेर चे पाहुणे येतात . सर्व रेजिमेंट त्यात असतात . आकाशात विमानांची प्रात्यक्षिकं होतात. आता तू पहाशीलच ” एरवी न बोलणारे हे भरभरून बोलत होते आणि गादी खालचं आईचं पत्र मी तसंच मनातून वाचत होते.
आम्ही पोहोचलो त्यावेळी माणसांचे लोंढेच्या लोंढे येत होते . आम्ही पोहचलो तेव्हा समोरच्या सा-या रांगा भरल्या होत्या . सारे चटया घेऊन आले होते.
ह्यांचा मित्र म्हणाला
आपण चौघं आहोत . वहिनीला मधे करा , दोन मागे दोन साइडला चला , धक्का लागायला नको . आणि आपण खासदारांच्या खूर्च्या असतात तिथे जाऊ या”
आणि खरंच मी मधोमध एका बाजूला मित्रा ची बायको , दुस-या बाजूला हे . आणि मागे पुढे एक एक . माझी शाही सवारी चालली होती.
खाली गवत भिजलेलं होतं. खरं तर पाऊस नव्हता. दंव अजून तरी नव्हतं . रविराज आपल्या महालात निवांत पहुडले होते . धुक्याची एक जाड चादर चराचरावर

होती. परंतु पूर्व दिशा उजळत होती. केशरी रंगाची शिंपण आकाशभर होती.
आम्ही त्या खासदारांच्या खूर्ची पासून जवळच आमची चटई अंथरली . दोन स्वेटर , दोन शाली असूनही मला थंडी वाजत होती .
मित्र मेजर होता . तो म्हणाला
” साडे आठपर्यंत ह्या खूर्चीवर बसायला कोणीही येणार नाही. वहिनी तुम्ही आरामात बसा.”
मी बसले , ह्यांनी टपरीवरून मोठा ग्लासभर चहा आणला .आणि मग मला बरं वाटलं , थंडी कमी झाली.
ते सारेच चटईवर आरामात गप्पा मारत बसले . मलाही आता छान वाटत होतं , गर्दी क्षणाक्षणाला वाढत होती .
साडेसातला रविराज ढगांच्या रजईतून बाहेर आले , जमलेल्या गर्दीकडे पाहून स्मित हास्य केलं आणि आकाश गुलाबी सोनेरी झालं . झटपट तयार होऊन रविराज महाला बाहेर आले आणि कोवळ्या उन्हात दिशा दिशा झंकारल्या . वाराही अडखळला . आता खुप सुंदर वाटत होतं.
आता पोलीस दल सक्रीय झालं होतं.
माझ्या खूर्चीजवळ एक पोलीस आला.
” यह कूर्सियॉं मेहमान लोगोंके लिये हैं “
मी उठायला गेले , तर पावलं जड झाली होती , कधीची बसले होते . त्यांच्या माझी अवस्था लक्षात आली.
“बाईजी, आपने नहीं आना चाहिये था, अब आगयी होतो तो यही बैठीऍं. मैं एक रास्ता बता देता हूॅं, जहॉंसे भीड नहीं होगी . आणि त्याने त्यांच्या पोलीसकक्षातून जायला सांगितलं . आणि हातात त्यांचं कार्ड दिलं , त्यावर लिहिलं होतं .
“हरनाम सिंह पोलीस सुपरिटेडेंट.”
“बता देना हम उनकी फॅमिली से है .”
खासदार , आणि बाकी लोक वाढत गेले तसा तो पुन्हा आला
“तकलिफ तो नहीं है ना, कोई आयेगा तो मेरा कार्ड दिखाना “. तो गेला पुन्हा आला नाही .
पूर्ण कार्यक्रम पाहिला नाही तरी जवळ जवळ पूर्ण होत आला होता .
आज टीव्हीवर हा कार्यक्रम लोकांना घरबसल्या पहायला मिळतो पण अगदी पूर्ण कार्यक्रम किती लोक पहात असतील देवजाणे. हा राष्ट्रीय कार्यक्रम सर्वांसाठी आहे , सर्वांनी आवर्जून पहावा असं मला वाटतं .
येताना त्यांनी दिलेल्या कार्डचा वापर न करता मला तसंच शाही सवारी करून गर्दी तून बाहेर आणलं .
आयुष्यात असा काही भव्य दिव्य, राष्ट्रीय समारोह मी पाहू शकेन अशी कल्पनाही केली नव्हती.
थकून घरी परतले.
आता पुढे….

शुभांगी भडभडे

Leave a Reply