अल-कायदा दहशतवादी संघटनेने दिली भारतात आत्मघाती हल्ले करण्याची धमकी

नवी दिल्ली : ८ जून – अल-कायदा या दहशतवादी संघटनेनं भारतामध्ये आत्मघाती दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. अल-कायदा इन द सबकॉन्टीनंट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेनं गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघाती हल्ले करण्याचा इशारा दिलाय. प्रेषित मोहम्मद यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:ला उडवून देण्यासाठी तयार आहोत, असं या दहशतवादी संघटनेनं म्हटलंय.
भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अवमान करणारं वक्तव्य केल्याच्यासंदर्भातून हा इशारा देण्यात आलाय. संघटनेनं जारी केलेल्या पत्रकामध्ये ‘भगवे दहशतवादी’ असा उल्लेख करत भारतीयांनी दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये होणाऱ्या हल्ल्यासाठी तयार रहावे असा इशारा देण्यात आलाय. त्यांना ना त्यांच्या घरात आश्रय मिळणार, ना त्यांच्या सैन्य छावण्यांमध्ये असा उल्लेख करत आत्मघाती हल्ला करणार असल्याचा इशारा या संघटनेनं दिलाय.
“जे आपल्या प्रेषितांचा अपमान करतात आपण त्यांना ठार मारलं पाहिजे. जे आपल्या प्रेषितांबद्दल अपशब्द वापरतात त्यांना उडवून लावण्यासाठी आपण स्वत:बरोबरच स्वत:च्या मुलांच्या अंगावरही स्फोटके बांधून हल्ला केला पाहिजे. त्यांना यासाठी कोणतीही माफी मिळणार नाही, कोणतीही शांतता आणि सुरक्षा त्यांना वाचवू शकणार नाही. हे प्रकरण निंदा किंवा दुःखाच्या कोणत्याही शब्दांनी शांत होणारं नाहीय,” असंही या संघटनेनं पत्रकात म्हटलंय.
या पत्रामध्ये भाजपाच्या सत्तेचा उल्लेख ‘भारतावर ताबा मिळवलेले हिंदू दहशतवादी’ असा केलाय. प्रेषितांच्या सन्मानासाठी या युद्धामध्ये सहभागी होण्याचं आवाहन या दहशतवादी संघटनेनं इतरांना करताना. या युद्धात प्राण गमावले तरी हरकत नाही असं म्हटलंय. नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षाच्या धोरणांच्याविरोधात भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत नुपूर यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचं पक्षाने स्पष्ट केलंय.

Leave a Reply