९ महिन्याच्या मुलीसह मातेने घेतला गळफास, सुदैवाने बालिका बचावली

यवतमाळ : ७ जून – मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे माहेरी राहत असलेल्या विवाहितेने नऊ महिन्याच्या मुलीसह गळफास घेतला. यात महिलेचा मृत्यू झाला, तर बालिका सुदैवाने बचावली. ही घटना मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
रोशनी झाडे, (२४, रा. शेखापूर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. रोशनीचे पती आशीष यांचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर ती मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे वडील जितेंद्र वैद्य यांच्याकडे आली. जितेंद्र हे ऑटो चालक आहेत. आज सकाळी वडील घराबाहेर गेले असताना रोशनीने घरामागील खोलीत जाऊन मुलीसह पंख्याला साडीने गळफास घेतला. या प्रयत्नात रोशनीचा जागीच मृत्यू झाला, तर साडीची गाठ सैल झाल्याने चिमुरडी बचावली. तिच्या रडण्याच्या आवाजाने घरातील सदस्यांनी खोलीकडे धाव घेतली असता, ही बाब दृष्य नजरेस पडली.पती निधनानंतर ती नैराश्यात असल्याचे सांगण्यात येते. मात्र तिने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. मारेगाव पोलीस अधिक तपास करीत आहे.

Leave a Reply