भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने मदत मागावी – असदुद्दीन ओवैसी

मुंबई : ७ जून – राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपामध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून मतांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. सहयोगी व अपक्ष आमदारांनी नाराजीचा सूर लावल्याने शिवसेनेसाठी दुसरी जागा निवडून आणण्याचे आव्हान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यात लक्ष घालत आहेत. दरम्यान एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी याबाबत भाष्य केले आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने मदत मागावी असं आवाहन ओवेसी यांनी केले आहे.
“महाविकास आघाडीतर्फे कोणीही माझ्यासोबत किंवा आमच्या आमदारासोबत संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आम्ही वाट पाहू. जर महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. गरज नसेल तर ठीक आहे आम्ही आमचा निर्णय घेऊ. आम्ही आमच्या आमदारांसोबत बोलत आहोत आणि एक किंवा दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ,” असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना व सहयोगी आमदारांची बैठक घेत कशाचीही भीती न बाळगता शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी वर्षां या सरकारी निवासस्थानी शिवसेनेच्या व सहयोगी आमदारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर टक्केवारीचा आरोप करत घरचा अहेर देणारे शिवसेनेचे माजी व आता अपक्ष आमदार आशीष जैस्वाल यांच्यासह इतर अपक्ष आमदारही बैठकीला उपस्थित होते.
तर दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपची नेतेमंडळी मतांची जुळवाजुळव करण्याकरिता सक्रिय झाली आहेत. काँग्रेसचा उमेदवार पराभूत होणे हे भाजपाच्या दृष्टीने अधिक फायद्याचे व तसे भाजपाने सूचित केल्यानेच काँग्रेसचे नेते सावध झाले आहेत. सर्व आमदार मतदानाला उपस्थित राहावेत याकरिता महाविकास आघाडीने मंगळवारी सर्व आमदारांना मुंबईतच पाचारण केले असून शुक्रवापर्यंत सर्वाना एकत्र ठेवले जाणार आहे.

Leave a Reply