अल्पवयीन मुलीला प्रेमजाळ्यात ओढून केले लैंगिक शोषण

नागपूर : ७ जून – एकाच वस्तीत राहत असताना आरोपीने फोनवर बोलून काहीच महिन्यात प्रेमजाळय़ात ओढत अल्पवयीन मुलीला विश्वासात घेत तिला घरी बोलावले. येथे त्याने तिच्यासोबत जबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कुणाला याची माहिती दिल्यास घरच्यांना मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. मनीष सुरेश लिंबाडे (वय २४) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
आरोपी आणि पीडिता हे दोघेही एकाच वस्तीत वास्तव्याला आहे. पीडितेला आई, वडील आणि एक मोठा भाऊ आहे. आरोपी हा वस्तीतच राहत असल्यामुळे पीडितेचे कुटुंबाची तशी ओळख होती. परंतु, काही महिन्यांपूर्वी पीडिता आणि आरोपी यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर करीत फोनवर बोलणे सुरू केले. आरोपीने तिला २४ एप्रिल रोजी त्याच्या घरी भेटायला बोलावले. पीडितेच्या घरचे सगळे झोपले असताना मुलीने घरातून पाय काढला आणि त्याच्या घरी भेटायला गेली. यावेळी आरोपी मनीषने तिच्यासोबत जबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इकडे पीडितेच्या आजीला रात्रीची जाग आली आणि तिला पीडिता दिसून आली नसल्यामुळे तिने घरच्यांना सगळय़ांना उठवले. मुलगी मिळत नसल्यामुळे रात्रीच घरच्यांची शोधाशोध सुरू झाली. तितक्यातच पीडिताही घराच्या मागून आत आली. यावेळी घरच्यांनी तिला कुठे गेली होती, यासंदर्भात विचारणा केली. परंतु, मुलीने वेळ मारून नेत झालेल्या प्रकाराबाबत काहीही वाच्यता केली नाही. घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर घरच्यांनी थेट जरीपटका पोलिस ठाणे गाठले आणि आरोपी मनीषविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्घ ३७६ (२) (१), ३७६ (२) (एन) भादंवि सहकलम ४,६ पोक्सो कायदा अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली. त्यानंतर सोमवारी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला ९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply