हिंदू नागरिकांच्या हत्येनंतर काश्मीरमधून १८०० काश्मिरी पंडितांसह सरकारी कर्मचाऱ्यांचे स्थलांतर

श्रीनगर : ३ जून – दक्षिण काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात ४८ तासांच्या आत दोन हिंदू नागरिकांची हत्या करण्यात आल्याने काश्मीर खोऱ्यातील तणाव वाढत आहे. हिंदू नागरिकांच्या हत्येने काश्मिरमधील निर्वासित दहशतीच्या छायेत आहेत. अशातच, तेथील नागरिकांनी सामूहिक स्थलांतर करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सामूहिक स्थलांतर करण्याची घोषणा केली आहे. आत्तापर्यंत जवळपास १८०० काश्मिरी पंडितांसब तीन हजारांहून अधिक नागरिकांनी जम्मू- काश्मीर खोऱ्यातून स्थलांतर केले आहे.
काश्मिरी पंडितांची निवासस्थाने तसंच संबंधित परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस तसेच निमलष्करी पथकांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक भागांत स्थानिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. कुलगाममधील बँक मॅनेजरच्या हत्येनंतर जम्मूतील तणाव अधिक वाढला आहे. काश्मिरी पंडित महिलेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ही महिला जम्मूतून स्थलांतर करण्याची मागणी करत आहे. आम्ही कित्येक वर्षांपासून इथे वास्तव्य करतोय मात्र आता जी स्थिती आहे ती सरकारच्या नियंत्रणाबाहेरची आहे. त्यामुळं आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी जम्मू खोरे सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं ही महिला व्हिडिओत म्हणते आहे.
काश्मिरी पंडितांनी सकाळीत जम्मू खोऱ्यातून स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या घराबाहेर असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनागमधील मट्टनमधून २१ परिवार, बारामुल्लामधून ५ , शेखापोरामधून १२ आणि श्रीनगरमधून ७ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. एका काश्मिरी पंडिताने दिलेल्या माहितीनुसार, यापेक्षा अधिक कुटुंबांनी खोरे सोडले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू- काश्मीर खोऱ्यात ८ हजार कर्मचारी आहेत. यातील १८०० कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे कुटुंबातील सदस्यही राहतात. त्यातील १३०० कुटुंबाना ट्राजिस्ट कॅपमध्ये सोय करण्यात आली होती. बाकी भाड्याने घरं घेऊन राहतात. १२ मेला राहुल भटच्या हत्येनंतर आत्तापर्यंत १८०० काश्मिरी पंडित जम्मूकडे रवाना झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा परत येऊ, असं त्यांचं म्हणणं आहे.

Leave a Reply