राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

मुंबई : ३ जून -महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाऊ शकणाऱ्या ६ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. यासंदर्भात महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीकडून भाजपाला देण्यात आलेल्या ऑफरची चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी भाजपाकडून देखील ऑफर देण्यात आली असून त्यावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून त्यावर निर्णय घेणार असल्याची माहिती या शिष्टमंडळासोबत गेलेले राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राज्यसभेच्या जागांसाठी आवश्यक असणारी आमदारांची मतसंख्या महाविकास आघाडीकडे अतिरिक्त असताना त्या आधारावर सहावा उमेदवार कुठल्या पक्षाचा निवडून येणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यातून सहा जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र, आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू झाला आहे.
दरम्यान, यावेळी छगन भुजबळांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून भाजपाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. “राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उरलेल्या मतांची संख्या महाविकास आघाडीकडे जास्त आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला ही संधी द्या. आमचा एक उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध जाऊ द्या. तुम्ही माघार घ्या. पुढच्या वेळी या जागेची भरपाई विधानपरिषदेच्या वेळी करु”, असं छगन भुजबळ म्हणाले.
महाविकास आघाडीच्या या प्रस्तावानंतर त्यावर भाजपाकडून देखील याच्या उलट करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. “चर्चा चांगली झाली. हसत खेळत झाली. ३ वाजेपर्यंत माघार घ्यायची आहे. त्यांच्याकडून ऑफर अशी होती की ही राज्यसभेची जागा तुम्ही आम्हाला सोडा आणि आम्ही तुम्हाला विधान परिषदेची जागा जास्तीची देतो. आम्हीही आमच्या नेत्यांशी चर्चा करू. मग ते दिल्लीला कळवून त्याबाबत चर्चा करतील. कुणीतरी एकाने माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश मिळेल असं आम्हाला वाटतंय”, असं भुजबळांनी यावेळी नमूद केलं.
“आपण राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. ती प्रथा आहे. आम्ही पुढाकार घेतला, त्यांनी चर्चेला प्रतिसाद चांगला दिला आहे”, असं देखील भुजबळांनी नमूद केलं.

Leave a Reply