कोंबड्याला जडले दारूचे व्यसन, निर्व्यसनी मालक पशुवैद्यकीय दवाखान्यात करतो पायपीट

भंडारा : ३ जून – भंडाऱ्यात चक्क एका कोंबड्याला दारूचं व्यसन जडलंय. इतकंच काय दारू घेतल्याशिवाय कोंबड्याच्या घशाखाली अन्न-पाणीही जात नाही. आता सतत पडणारा आर्थिक भूर्दंड आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे मालकाला कोंबड्याचं हे व्यसन सोडवायाचं आहे. आपल्या कोंबड्याच्या व्यसनामुळे चिंतेत पडलेला मालक दारू सोडण्यासाठी विविध उपाय करू लागला आहे.
भंडारा शहरानजीक पिपरी पुनर्वसन गावात भाऊ कातोरे हे राहतात. ते शेतकरी आहेत. भाऊ कातोरे यांना कुक्कुटपालन करण्याचा छंद जडला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे विविध प्रजातिचे कोंबडे आहेत. पण सध्या ते आपल्या एका कोंबड्याच्या वाइट सवयीमुळे चिंतेत आहेत. भाऊ कातोरे आपल्या कोंबड्याला जबरदस्तीने पाणी पाजण्याचा प्रयत्न करतात. मात्र कोंबडा पाणी प्यायलाही तयार होत नाही. त्यानंतर भाऊ कातोरे हे चक्क विदेशी दारू घेऊ येतात. पाण्यात दारू मिसळवून ते कोंबड्याला देतात. बघता बघता कोंबडा दारू प्यायला सुरू करतो. जेवणही करू लागतो. भाऊ कातोरे यांच्या या कोंबड्याला दारूचं व्यसन जडलंय.
गेल्या वर्षी कोंबड्यांवर “मरी” रोग आला होता. आपल्या प्रिय कोंबड्याला मरी रोग जडल्याने कोंबड्याने खानं-पीणं सोडलं होतं. कोणीतरी सांगितलं म्हणून मरी रोगावर उपाय म्हणून त्यांनी काही महीने मोहफूलाची देशी दारू कोंबड्याला पाजली. मात्र मोह फुलाची दारू मिळेनासी झाल्यावर त्यांनी विदेशी दारूचा उतारा देणं सुरू केलं. आता सततच्या दारू सेवनाने त्यांच्या कोंबड्याला दारूचं व्यसन जडलं आहे. दारू प्यायल्याशिवाय पाणी प्यायलाही कोंबडा तयार होत नाही. यामुळे निर्व्यसनी मालकही आपल्या प्रिय कोंबड्याला वाचवण्यासाठी त्याचे व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
ह्या कोंबड्याला रोज ४५ मिलीचा पेग लागत असून त्याच्या शिवाय अन्न पाण्याला हात लावत नाही. आता दर महिन्याला मालकाला २ हजार रूपयांचा भूर्दंड बसतोय. सामाजिक प्रतीष्ठा जपण्यासाठी त्यांना दारू लपून आणण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कोंबड्याचे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी मालकाची पशुवैद्यकीय दवाखाण्यात पायपिट सुरू आहे.
पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. कोंबड्याच्या या व्यसनाने कोणतेही नुकसान नसल्याचे त्यांनी सांगितले. उलट कोंबड्याच्या पोटातील जंतू मरत असल्याचा फायदाही त्यांनी संगितला आहे. मात्र मालकाला सोसावा लागत असलेला आर्थिक भूर्दंड लक्षात घेता. दारूच्या वासाचे एकादे सायरप पाजण्याचा सल्ला त्यांनी दिला. हळूहळू प्रमाण कमी केल्यास कोंबड्याची दारू सुटेल, असं पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांनी सांगितलं.

Leave a Reply