सपनोका सौदागर… – विनोद देशमुख

छोट्या पडद्यावर एकेकाळी मुंगेरीलालके हसीन सपने… ही मालिका खूपच गाजली होती. तिची मराठी आवृत्ती नुकतीच निघाली आहे. या मालिकेचं नाव आहे- दिव्यदृष्टी संजयची दिवास्वप्नं !
स्वप्न पाहण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. आणि मुख्य म्हणजे, या स्वप्नांना विषयाचं बंधन नसतं. मला लहानपणी स्वप्नं पडायची की, आपण फार मोठे क्रिकेटपटू झालो आहोत किंवा मोठे गायक झालो आहोत. प्रत्यक्षात फुस्स ! मोठा सोडाच, पण छोटासा क्रिकेट खेळाडू सुद्धा होता आलं नाही मला. काॅलेजपर्यंत जे काही थोडंफार क्रिकेट खेळलो तेवढंच. गायक होण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्यासाठी लागणारं काहीच माझ्याकडं नव्हतं. तरीही, स्वप्नं पाहण्यापासून मला कोणी रोकू शकलं नाही, ही वस्तुस्थिती आहेच.
हाच नियम सर्वांना लागू आहे. व्यक्तिगत स्वप्न पाहणाऱ्याला, तसंच स्वत:ची संस्था किंवा संघटनेसाठी स्वप्न पाहणाऱ्यालाही आहे. दिव्यदृष्टी लाभलेल्या संजयलाही तो लागू आहे. त्यामुळंच त्यानं पाहिलेलं ताजं स्वप्न ऐकून कोणालाही आश्चर्य वाटायला नको. आपले उधोजी राजे पुढील पंचेवीस वर्षांसाठी मराठा साम्राज्याचे महाराज झाले, असं स्वप्न संजयला पडलं. याला म्हणतात स्वामीभक्ती. स्वप्न सुद्धा मालकाचं, मालकासाठीच पाहायचं असतं बघा !
अचानक हेचं स्वप्न कसंं काय पडलं असेल ? तर, महाराजांच्या आसनाला धोका होतो की काय, अशी इशाऱ्याची घंटा मध्येच वाजली ! द्वादशमतीची राजकन्या गेली होती मराठा साम्राज्याच्या कुलदेवतेचं दर्शन घेण्यासाठी. त्यांनी स्वत: तुळजाईला काय साकडं घातलं, माहीत नाही. पण, उपस्थित दरबाऱ्यांनी म्हणे देवीला आळवलं- माते, आमची राजकन्या मराठा साम्राज्याची महाराणी होऊ दे ! संजयला इशारा लक्षात येताच त्यानं आपल्या महाराजांचं घोडं पुढं दामटलं. आमचेच राजे पाव शतकापर्यंत महाराज राहावे, असे महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना वाटत (“हे तो रयतेची इच्छा”) आहे. मुंबापुरी विरुद्ध द्वादशमती/पुण्यनगरी असा वाद होण्याची तर ही लक्षणं नव्हेत !
उधोजीराजे सध्या ६२ वर्षांचे आहेत. आणखी २५ म्हणजे ऐंशी पार ! भारतवर्षात पंच्याहत्तरीला वानप्रस्थाश्रमाच्या गोष्टी सुरू असताना आणि काही अंशी अंमलबजावणी सुरूही झाली असताना, हे कसं काय शक्य होईल, हे मात्र संजय सांगत नाही. पण, राजकन्येच्या चाहत्यांच्या स्वप्नानं संजयच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. म्हणूनच, कोणाची “मती” फिरायच्या आत त्यानं आपलं प्रतिस्वप्न जाहीर करून टाकलं. जमानाही मार्केटिंग का है साब !

विनोद देशमुख..

Leave a Reply