वर्धा : २ जून – वडिलांशी वाद का घातला, याचा जाब विचारण्यास गेलेल्या अवघ्या 27 वर्षीय युवकाला दगडाने ठेचून मानेवर धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना धक्कादायक घटना वर्धा शहरातील स्टेशनफैल परिसरात मंगळवारी रात्री घडली. या घटनेने स्टेशनफैल परिसरात खळबळ माजली. पोलिसांनी आरोपी बाप लेकासह त्याच्या मावस भावाला रात्रीच बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष आनंद रणधीर (27, रा. स्टेशनफैल) असे मृतक युवकाचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणात शुभम जयस्वाल (27), वडील लक्ष्मीनारायण जयस्वाल (64) आणि आदित्य जयस्वाल यांना अटक केली आहे.
मृतक आशिष रणधीर आणि आरोपी शुभम जयस्वाल हे दोघेही एकाच परिसरातील रहिवासी असून अगदी काही अंतरावर दोघांचेही घरं आहेत. मृतक आशिषचे वडील आनंद रणधीर यांचा 31 मे रोजी सकाळच्या सुमारास आरोपी शुभम जयस्वाल याच्याशी वाद झाला होता. आशिषने मध्यस्थी केली असता बाचाबाची झाली होती.
त्यानंतर रात्रीच्या सुमारास मृतक आशिष हा घरासमोरील चौकात गेला असता तेथे पुन्हा आरोपी शुभमने वाद घातला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. अन् संतापलेल्या शुभम जयस्वाल याने काठीने मारहाण करणे सुरू केले. तेवढ्यातच शुभमचे वडील लक्ष्मीनारायण तेथे आले आणि त्यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली. मृतक आशिषला जमिनीवर पाडून त्याच्यावर दगडाने प्रहार केला त्यानंतर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन तेथून पळ काढला.
रक्तबंबाळ अवस्थेत आशिष जमिनीवर निपचीत पडून होता. त्याच्या दोन मित्रांनी त्याला दुचाकीवर बसवून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय गाठले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच त्याने श्वास सोडला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करुन प्रकरण जाणून घेत रात्रीच तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप करीत आहे.