एक व्यक्ती एक पद या ठरावानुसार विकास ठाकरे यांनी दिला शहर अध्यक्षपदाचा राजीनामा

नागपूर : २ जून – पक्षाने राज्यसभेसाठी राज्यातून परराज्यातील उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगले आहे. अनेक स्थानिक नेत्यांनी एक व्यक्त एक पद या ठरवाचे काय झाले म्हणत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. याच कारणामुळे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र उदयपूर येथील चिंतन शिबिरातील एक पद एक व्यक्ती या ठरावानुसार काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर शहर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसच्या राजस्थानमधील उदयपूर येथील चिंतन शिबिरात एक व्यक्ती एक पद असा ठराव करण्यात आला. या ठरावानुसार आमदार ठाकरे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे .शिवाय या चिंतन शिबिरामध्ये एका व्यक्तीला पाच वर्षांपेक्षा अधिकाळ पक्षसंघटनेत पदावर राहता येणार नाही असा ठरावही झाला होता. विकास ठाकरे हे सुमारे आठ वर्षापासून नागपूर शहराध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. तसेच ते आमदार म्हणूनही 2019 मध्ये निवडून आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या चिंतन शिबिरातील ठरावानुसार ठाकरे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता “मी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे. उदयपूर चिंतन शिबिरामध्ये ठराव झाल्यानंतर लगेचच मी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवून दिला आहे” असे ठाकरे म्हणाले.
दरम्यान नागपूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनीदेखील जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. परंतु ते शिर्डी येथील चिंतन शिबिरात व्यस्त असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याविषयी पुष्टी मिळू शकली नाही.

Leave a Reply