विकृत मानसिकतेच्या आरोपीने ६ अल्पवयीन मुलांवर केला अनैसर्गिक अत्याचार

नागपूर : १ जून – सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाराजबाग परिसराला लागून असलेल्या एका पडक्या घरात एका विकृत मानसिकतेच्या आरोपीने सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना एप्रिल २0२२ ते २७ मे २0२२ या काळात सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली. मयूर मोडक (२८, रा. धरमपेठ) असे आरोपीचे नाव आहे. मयूर हा अमरावती रोडवरील झोपडपट्टीत राहणारा नऊ वर्षांचा मुलगा व त्याच्या मित्रांना महाराज बागेलगतच्या आवारात आंबे व चिंचा तोडण्यासाठी घेऊन जात असे. तेथे त्याने मुलांना पडक्या घरात नेऊन अनैसर्गिक कृत्य करण्यास सुरुवात केली. एप्रिलपासून हा प्रकार सुरू केला. शुक्रवार २७ मे रोजीही मयूरने नऊ वर्षाच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले होते. घरी परतल्यावर मुलाला वेदनांनी त्रासलेले पाहून वडिलांनी विचारपूस सुरू केली. त्यानंतर मुलाने झालेल्या कृत्याबाबत सांगितले. मुलाच्या वडिलांनी सीताबर्डी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. यानंतर वस्तीतील पीडित मुलांनीही आपल्यासोबत हेच घडल्याचे सांगितले. यामुळे वस्तीत एकच खळबळ उडाली. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी भादंविच्या कलम ३७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मयूर बेरोजगार असून काहीच करीत नसल्याची माहिती आहे. सध्या तो फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपीविरुद्ध कलम ३७७ आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply