राजे राजकारणात चढउतार हे येत असतात, ते पचवता आले पाहिजेत – संजय राऊतांचा संभाजीराजेंना सल्ला

पुणे: १ जून – राजकारणात चढउतार हे येत असतात. ते पचवता आले पाहिजेत, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजे छत्रपती यांना दिला. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अपक्ष लढायची तयारी केली होती. मात्र, कोणत्याच पक्षाने त्यांना पाठिंबा न दिल्यामुळे संभाजीराजे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या भूमिकेविषयी नाराजीही व्यक्त केली होती.या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज पुण्यातील एका कार्यक्रमात भाष्य केले.
यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, राजाला फक्त प्रजा असते, समर्थक नाही. संभाजीराजे, आपण राजकारणात आहात चढउतार येत असतात, ते पचवता आले पाहिजेत, असे राऊत यांनी म्हटले. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ईडीचा वापर होईल, अशी भीती अनेकांना वाटत आहे. कोणी कितीही घोडे उधळू द्या. पण शिवसेनेचा सहाव्या जागेवरील उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला.
नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या विकासनिधीतून उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला संजय राऊत यांनी हजेरी लावली होती. यावेळी संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. सगळ्या संकटात आमची लोकं टिकून राहिली. आपण टिकून राहिलो म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. उडून गेलेल्या कावळ्यांमुळे नव्हे तर तुमच्यासारख्या मावळ्यांमुळे त्यांना मुख्यमंत्री होता आले, असे राऊत यांनी म्हटले.
आम्हालाही हनुमान चालीसा म्हणता येते. पण लोकांचे प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे आहेत. रस्ते, रोजगार आणि पाणी ही सगळी कामं शिवसेनेचे नगरसेवकच करतात. आम्ही फक्त राजकारण करत नाही. आपण भोंगे लावून सांगत नाही. पण आता आपणही भोंगे लावून आपण पाच वर्षांत काय काम केले, हे सांगायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Leave a Reply