फारूक अब्दुल्ला यांची ईडीकडून तीन तास चौकशी

श्रीनगर : १ जून – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री खासदार फारूक अब्दुल्ला यांची मंगळवारी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तीन तासांहून अधिक काळ चौकशी केली. हे प्रकरण जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघटनेतील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे. खासदार अब्दुल्ला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राजबाग येथील ‘ईडी’च्या कार्यालयात पोहोचले. ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या चौकशीचा जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, की मला या चौकशीसाठी बोलावल्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. निवडणुका होणार आहेत आणि तोपर्यंत ते आम्हाला त्रास देतील. सुमारे साडेतीन तास चाललेल्या प्रश्नोत्तरांनंतर कार्यालयातून बाहेर पडताना त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास नकार दिला. ‘ईडी’ने २७ मे रोजी अब्दुल्ला यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी श्रीनगर कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.

Leave a Reply