गोरेवाड्यातील ली वाघिणीने तिसऱ्यांदा जन्म दिल्यानंतर गमावले बछडे

नागपूर : १ जून – मातृत्वाची अनुभूती म्हणजे सुखद अनुभव, पण मूल जन्माला येताच ते गमवावे लागले, तर ते दुःख न पचवता येणारे असते. ‘ली’ वाघिणीच्या बाबतीतही नेमके हेच घडले. एकदा, दोनदा नाही तर तिसऱ्यांदा तिला मातृत्वाची अनुभूती येऊनही प्रत्येकवेळी बछड्यांना गमवावे लागले. बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात ‘ली’ या वाघिणीचा मातृत्वाचा सोहळा रंगण्याआधीच त्या आनंदावर विरजण पडले.
‘ली’ ही वाघीण अवघी महिनाभराची असताना २००९ साली चंद्रपूर जिल्ह्यातून महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आली. तीन वर्षांपूर्वी ‘राजकुमार’ हा वाघ भंडारा जिल्ह्यातील एका लग्नसमारंभात पोहोचल्याने त्याची रवानगी थेट गोरेवाड्यात करण्यात आली. त्याला सोबत म्हणून महाराजबाग प्राणिसंग्रहालयातून ‘ली’ ला देखील गोरेवाड्यात आणले. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात दोघांनाही सफारीसाठी एकत्रच सोडण्यात आले. त्यातून १३ वर्षाची ‘ली’ गर्भवती राहिली.
मंगळवारी (३१ मे) दुपारी ‘ली’ला प्रसूती वेदना सुरू झाल्या. चार वाजता तिने बछड्याला जन्म दिला. त्याला चाटल्यानंतर तिने बछड्याची शेपूट पकडून त्याला गवतात झाकले. थोड्यावेळाने त्याला पुन्हा उचलले आणि त्याचवेळी त्याच्या डोक्याला मार लागला व तो मृत पावला. ‘ली’ पुन्हा दुसऱ्या बछड्याला जन्म देईल म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाट पाहिली, पण बुधवारी सकाळपर्यंत तसे काही झाले नाही.
जन्म दिल्यानंतर या पिल्लाला उचलताना वाघिणीचा दात लागून पिल्लाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. यावेळी प्राणीसंग्रहालयाचे पशुवैद्यकांसह महाराष्ट्र मत्स्य आणि पशू विज्ञान विद्यापिठातील तज्ञ डॉक्टरांचे एक पथक प्राणिसंग्रहालयात उपस्थित होते. रात्री उशीरा तिच्या प्रसव पिडा थांबल्यानंतर तिच्या गर्भात आणखी पिल्ले आहेत किंवा असल्यास त्याबाबत पुढील उपचार या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शना करण्यात येत आहे.
ली आणि राजकुमार या गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील वाघाच्या जोडीला पिल्ले होण्यासाठी गेल्या २ वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. ली चे वय जास्त असल्याने सदर प्रयत्नाना अपेक्षित यश मिळण्यास अडचणी होत्या. ली चे वय साधारण ११ वर्षे आहे (वाघाचे नैसर्गिक आयुष्य १०-१२ वर्षे असते.) गेले महिनाभर ली वाघिणीला राजकुमारपासून स्वतंत्र ठेवून तिच्या गर्भारपणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तिच्या नैसर्गिक पद्धतीने प्रसव होण्यासाठी तिच्या रात्र निवाऱ्यात विशेष बाळंतगुफा तयार करण्यात आली आहे. या गुफेत तापमान आणि प्रकाश नियंत्रण व्यवस्थे-व्यतिरिक्त रबरी मॅट, गवताच्या गाद्या याशिवाय़ कुलरची सोय देण्यात आली होती. वाघिणीच्या नैसर्गिक वर्तुवणूकीत बदल न होता लक्ष देण्यासाठी विशेष सि.सि.टी व्ही कॅमेरा बसविण्यात आले होते.
यापूर्वी २०१८ साली ‘ली’ गोरेवाडा बचाव केंद्रात ‘साहेबराव’ या वाघापासून गर्भवती राहिली होती. त्यावेळी देखील तिने चारही बछडे गमावले. तर महाराजबाग प्राणिसंग्रहालयात देखील ‘साहेबराव’ या वाघापासून ती गर्भवती राहिली, पण तिथेही तिने बछडे गमावले. तीनदा मातृत्वाची अनुभूती येऊनही मातृत्वाचा सोहोळा तिला साजरा करता आला नाही.

Leave a Reply