अद्यापही जीएसटीचे 15 हजार कोटी रुपये केंद्राकडे थकीत – अजित पवार

मुंबई : १ जून – महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने केंद्र सरकारने जीएसटीची देण्याची मागणी केली जात होती. अखेर केंद्राकडून महाराष्ट्राला 14 हजार कोटी रुपये जीएसटी परतावा देण्यात आला. केंद्र सरकारकडून 31 मे 2022 पर्यंतचा जीएसटी परताव्याची संपूर्ण रक्कम राज्यांना वितरित करण्यात आली आहे. परंतु या जीएसटी परताव्यावरुन दावे प्रतिदावे केले जात आहे. महाराष्ट्राला जीएसटी परतावा मिळाला, आता राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणार की शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडून धन्यता मानणार असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अद्यापही जीएसटीचे 15 हजार कोटी रुपये राहिल्याचा दावा केला आहे.
केंद्र सरकारने एकूण 21 राज्यांना जीएसटी परतावा दिला आहे. यात महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. 21 राज्यांचा मिळून एकूण 86 हजार 912 कोटी रुपयांचा परतावा केंद्र सरकारकडून वितरित करण्या आला आहे. यातील सर्वाधिक 14 हजार 145 कोटी रुपयांचा परतावा महाराष्ट्राच्या वाट्याला आला आहे
दरम्यान केंद्र सरकारने जीएसटीचा संपूर्ण परतावा दिल्याचं सांगितलं असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अद्यापही जीएसटीचे 15 हजार कोटी रुपये राहिल्याचा दावा केला आहे. अजित पवार म्हणाले की, “केंद्र सरकारने दिलेले पैसे हे महाराष्ट्राच्या हक्काचे होते. ते आधीच द्यायला हवे होते. आता पैसे आले आहेत. जीएसटीचे 15 हजार कोटी रुपये अद्याप बाकी आहे. केंद्र सरकाराने काल वितरित केलेले 14 कोटी रुपये हे जुने कबूल केलेले पैसे आहेत. पैसे टप्प्याटप्प्याने येत आहेत. आता पुढचे पण पैसे त्यांनी लवकर द्यावेत ही माफक अपेक्षा आहेत. 29 हजार कोटी येणं बाकी होतं. काल रात्री 14 हजार 145 कोटी रुपये एवढी रक्कम आलेली आहे अजून 15 हजार कोटी रुपये राहिलेले आहेत. ते पण पाठपुराव्याने मिळवू.”
जीएसटी परतावा मिळाला आता तरी महाराष्ट्रात इंधनावरील दर कमी करणार का, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की, “जीएसटीचे पैसे काय पेट्रोल-डिझेल करता मिळालेले नव्हते. आम्ही पण पेट्रोल डिझेलचे दर कमी केले होते. केंद्राने पण कमी होते. परंतु आपण दर कमी केल्यानंतर पुन्हा किंमती वाढतात.”

Leave a Reply