संपादकीय संवाद – राज्यसभेसाठी बाहेरचा उमेदवार महाराष्ट्रावर लादून सोनिया गांधींनी चूक केली आहे

राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात उत्तरप्रदेशचा उमेदवार आणल्यामुळे काँग्रेस पक्षात प्रचंड नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खुलेआम नाराजी व्यक्त केली आहे. तर प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. आशिष देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामाच सादर केला आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही बाहेरून उमेदवार आणण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
अर्थात बाहेरून उमेदवार आणून त्याला सुरक्षित मतदारसंघ म्हणून उभे करणे आणि पक्षाची सोय करणे, हा प्रकार काही आजचा नाही. अनेकदा या प्रकारात बाहेरून आणलेल्या उमेदवाराचे सहकार्य मिळत नाही, आणि त्याला पराभवाला सामोरे जावे लागते. असा प्रकार दस्तुरखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतही घडला होता. काँग्रेसश्रेष्ठींच्या सूचनेवरून १९५२ च्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भंडारा जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती, त्यावेळी काँग्रेसजनांनी असहकार करून बाबासाहेबांना लोकसभेत जाण्यापासून रोखले होते. त्यावेळी संतप्त होऊन बाबासाहेबांनी काँग्रेस हे जळते घर आहे, त्यापासून दूर राहा असा सल्ला आपल्या लाखो अनुयायांना दिला होता. हा एक किस्सा झाला. असे अनेक किस्से काँग्रेसबाबत घडलेले आहेत, स्वर्गीय संजय गांधींचे मित्र असल्यामुळे त्यांची सोय लावायची म्हणून काँग्रेसने १९८० साली गुलाम नबी आझाद या काश्मिरी नेत्याला विदर्भातून निवडणुकीला उभे केले होते. नांतर काही काळ विदर्भाचे नेतृत्व केल्यावर गुलाम नबी आझाद काश्मिरात परत गेले, आता ते विदर्भाला विसरून गेले आहेत. तसेच कलकत्त्याचे कमलनाथ मध्यप्रदेशच्या छिंदवाड्यात आणून ठेवले होते, १९८४ मध्ये तेलंगणात तेलगू देसम या पक्षाचा तेलंगणात जोर वाढला होता, तिथे तत्कालीन काँग्रेस नेते नरसिंहरावांची खुर्ची धोक्यात आली होती, त्यामुळे नरसिंहरावांना रामटेकमधून उभे करण्यात आले, आणि दोनवेळा ते निवडूनही आले. नंतर नरसिंहराव पंतप्रधान झाले, त्यावेळी ते रामटेकला विसरले होते, त्यांनी तेलंगणातून निवडणूक लढवली आणि तेलंगणाचाच विकास केला.
हे प्रकार फक्त काँग्रेसनेच केले असे नाही, तर भाजप, शिवसेना हेदेखील त्यात आघाडीवर आहेत. प्रकाश जावडेकरांना राज्यसभेत घेण्यासाठी महाराष्ट्राबाहेरून निवडणूक लढवायला लावली होती, शिवसेनेला विदर्भातल्या आरक्षित मतदार संघामध्ये निवडणूक लढवायला कार्यकर्ता नव्हता त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि मुंबईत कार्यरत असलेल्या आनंद अडसूडांना आधी बुलढाण्यात नंतर अमरावतीत आणले होते. खासदारकीच्या काळात हे नेते तिथे तात्पुरती भाड्याची घरे घेऊन राहायची. असे प्रकार सर्वच पक्षांनी केले आहोत. कुणीही त्यातून सुटलेला नाही.
अश्या प्रकारे राजकीय सोय लावण्यासाठी आपल्या महत्वाच्या कार्यकत्यांना बाहेर पाठवले जसते मात्र जिथे त्यांना पाठवले जाते तिथे स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असतो, आज महाराष्ट्रात राज्यसभेत जाण्यासाठी अनेक लायक व्यक्ती आहेत, मात्र त्यांना डावलून प्रियांका गांधींच्या आग्रहाखातर हा उपरा महाराष्ट्राच्या उरावर लादला गेला, त्याचा महाराष्ट्रात काँग्रेसला काहीही फायदा होणार नाही, हे नक्की. मात्र याचा विचार पक्षश्रेष्ठी करायला तयार नाही, हे काँग्रेसचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात आधीच काँग्रेस बऱ्यापैकी खिळखिळी झाली आहे, शरद पवारांनी काँग्रेसची पुरती वाट लावली आहे, आज महाराष्ट्रात काँग्रेस ४ थ्या क्रमांकावर आहे, अश्यावेळी सोनिया गांधी महाराष्ट्रात पक्षाला बळ द्यायला हवे होते.
इथे सोनिया गांधी आणि सर्वच काँग्रेस चुकले आहे, हे वास्तव स्वीकारावेच लागनार आहे. .

अविनाश पाठक

Leave a Reply