विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला होणार मतदान

मुंबई : ३१ मे – राज्यसभेच्या निवडणुकीत पाठोपाठ विधानपरिषदेचीही निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होणार असून निवडणुकीसाठी राजकीय पक्षांत इच्छुकांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरले गेले असून, 10 जूनला राज्यसभा निवडणूक पार पडेल. मात्र, त्यानंतर विधानपरिषदेचा निवडणुकीचा आखाडाही रंगणार आहे. विधान परिषदेतील दहा सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन त्या जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर होणार असून 9 जूनपासून अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणुकांसाठी ही राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून या निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
विधान परिषदेवर भारतीय जनता पक्षाकडून असलेले प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत तसेच दिवंगत नेते आरएस सिंह यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते, मंत्री सुभाष देसाई हे निवृत्त होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि संजय दौंड यांचाही कार्यकाळ संपत आहे.
प्रत्येक पक्षाच्या सध्याच्या मतांची गोळाबेरीज पाहता भारतीय जनता पक्षाचे चार, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार विधानपरिषदेवर निवडून येऊ शकतो. विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या सत्तावीस मतांची गरज उमेदवाराला असते. भारतीय जनता पक्षाकडे मित्रपक्षांसह 113 आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकासआघाडीकडे एकूण 169 आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, शिवसेनेकडे 56 तर काँग्रेसकडे 45 आमदार आहेत. मात्र, विधान परिषदेवर काँग्रेसचाही दुसरा उमेदवार देण्यात यावा. यासाठी काँग्रेसने आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणायचा असल्यास भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल. तसेच भाजपच्या पाच जागा रिक्त होणार असून केवळ चार उमेदवारच निवडून येणार आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटातून कोणाचा पत्ता कट होणार याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाकडून विधानपरिषदेवर प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची वर्णी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. प्रवीण दरेकर हे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत तर आमदार प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी निकटवर्तीय मानले जातात. यामुळे या दोन उमेदवारांची नावे निश्चित असल्या तर भारतीय जनता पक्षाच्या गोटात म्हटले जाते. मात्र, तेथेच भारतीय जनता पक्षाकडून असलेले आमदार सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांच्या उमेदवारीवर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी या नेत्यांकडूनही देवेंद्र फडणीस यांच्याकडे लॉबिंग केली जात आहे. सुजितसिंह ठाकुर यांनाही पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळण्याची चिन्ह धूसर आहेत.

Leave a Reply