राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा समारोप होणार २ जूनला

नागपूर :३१ मे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा समारोप २ जून रोजी होणार आहे. रेशीमबाग येथील मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाग्यनगर येथील श्रीरामचंद्र मिशनचे अध्यक्ष दाजी उपाख्य कमलेशजी पटेल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. याप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचेदेखील उद्बोधन होईल. यंदा दोन वर्षांच्या कालावधीनंतर ९ मे रोजी तृतीय वर्ष वर्गाचे आयोजन झाले. देशभरातील ७३५ स्वयंसेवक शिक्षार्थ्यांसह एकूण ९०० कार्यकर्ता वर्गात उपस्थित आहेत. संघ शिक्षार्थ्यांना शारीरिक, बौद्धिक, सेवा यांच्यासह विविध विषयांबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
२ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर अतिथींचीदेखील उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी शिक्षार्थी विविध कवायती, योगासने सादर करतील, अशी माहिती वर्गाचे सर्वाधिकारी अशोक पांडे व महानगर संघचालक राजेश लोया यांनी दिली आहे.
वर्गातील शिक्षार्थी शेतकरी, शिक्षक, अभियंता, वैद्यकीय तज्ज्ञ
देशभरातील विविध प्रांतातून आलेल्या ७३५ शिक्षार्थी हे विविध व्यवसाय किंवा क्षेत्राशी जुळलेले आहेत. १६३ शिक्षार्थी हे प्रचारक-विस्तारक आहेत. ५७ शिक्षार्थी हे विद्यार्थी आहेत. याशिवाय नोकरदार (१०८), शिक्षक (१०३), शेतकरी (४७), लघु व्यावसायिक (४५), वकील (३१), अभियंता (२५), कामगार (२३), प्राध्यापक (१७), लघु उद्योजक (१४), वैद्यकीय तज्ज्ञ (५) यांचादेखील प्रामुख्याने समावेश आहे.

Leave a Reply