उद्धव ठाकरे हेच पुढची पंचवीस वर्षे मुख्यमंत्री व्हावेत अशी सर्वांची इच्छा – संजय राऊत

मुंबई : ३१ मे – सुप्रिया सुळे उस्मानाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य केले होते. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल, असे सुप्रिया सुळे यांनी उस्मानाबाद येथील स्थानिक पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. यावर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून सर्व नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर खूश असून उद्धव ठाकरे हेच पुढची पंचवीस वर्षे मुख्यमंत्री व्हावेत अशी सर्वांची इच्छा आहे, असे राऊत म्हणाले. ते आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
राऊत म्हणाले की, सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि सुप्रिया सुळे यांचे देखील हेच म्हणणे आहे की, हेच मुख्यमंत्री पुढील पंचवीस वर्षे राहणार. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोकं निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत आणि स्वतः शरद पवार, अजित पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी हे उद्धवजींच्या नेतृत्वावर खूश आहेत. त्यामुळे, हा प्रश्न जाने निर्माण केला असेल त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राज्यसभेसाठी सहापैकी ज्यांनी सातवी जागा भरलेली आहे, त्यांना या राज्यामध्ये घोडेबाजार करायचा आहे, असे दिसत आहे. खरं तर त्यांच्याकडे एवढी मत नाहीत. जर मत असती तर त्यांनी नक्कीच संभाजी राजे छत्रपती यांना उमेदवार केले असते. त्यांनी आधी छत्रपती संभाजी राजांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. त्यांना सहाव्या जागेसाठी उतरण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर त्यांना वार्यावर सोडले.
भाजपाचे आश्चर्य वाटते. भाजपाचे दोन्ही उमेदवार महाराष्ट्राचे नसून ते बाहेरचे आहेत. जे पार्टीची निष्ठावान आहेत. संघ परिवाराशी संबंधित आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे काम केल आहे त्यांना डावलण्यात आल्याचे मी वाचले. जे इतर पक्षातून आलेत आणि फक्त शिवसेना महाविकास आघाडीवर चिखलफेक करत असतात अशा लोकांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे, त्यांच्या पक्षातच फार नाराजी आहे, असे माझ्या वाचनात आणि पाहण्यात येत आहे, असे राऊत यांनी म्हटले. यानंतर आता संजय राऊत त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply