शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर बंगळुरूत शाईफेक, दोन गटांमध्ये बाचाबाची

बंगळुरू : ३० मे – भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्यावर बंगळुरूतील प्रेस क्लबमधील गांधी भवनात शाईफेक झाली आहे. यामागे स्थानिक शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेला कर्नाटकातील भाजप सरकार जबाबदार असल्याची टीका राकेश टिकेत यांनी केली.
गांधी भवनात राकेश टिकेत यांची पत्रकार परिषद सुरू असताना एका व्यक्तीनं त्यांच्यावर शाई फेकली. टिकेत यांच्या समर्थकांनी शाई फेकणाऱ्याला पकडलं. पत्रकार परिषदेत खुर्च्या फेकण्यात आल्या. शाई फेकणाऱ्याचं नाव मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. स्थानिक शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्याची चर्चा आहे. स्थानिक माध्यमांनी चंद्रशेखर यांचं स्टिंग केलं होतं. बस संपाच्या बदल्यात चंद्रशेखर पैसे मागत असल्याचं स्टिंगमध्ये दिसत होतं. स्टिंगमध्ये चंद्रशेखर यांनी राकेश टिकेत आणि अन्य शेतकरी नेत्यांचादेखील उल्लेख केला होता.
पत्रकार परिषदेत राकेश टिकेत यांना चंद्रशेखर यांच्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर माझं चंद्रशेखर यांच्याशी काहीच देणंघेणं नाही. चंद्रशेखर फ्रॉड आहे, असं टिकेत म्हणाले. यानंतर चंद्रशेखर यांच्या समर्थकांपैकी एकानं शाईफेक केली. शाईफेक झाल्यानं टिकेत समर्थक भडकले. त्यांनी शाई फेकणाऱ्याला पकडलं. चंद्रशेखर आणि टिकेत समर्थक भिडले. दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. घोषणाबाजी झाली. खुर्च्या फेकण्यात आल्या.
या घटनेवरून राकेश टिकेत यांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर सडकून टीका केली. स्थानिक पोलिसांकडून कोणतीही सुरक्षा पुरवली गेली नाही. सरकारच्या संगनमतानं शाईफेक झाली, अशा शब्दांत टिकेत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

Leave a Reply