जोपर्यंत तुम्ही लोकांची मनं जिंकत नाही, तोवर काश्मीरमध्ये शांतता येणार नाही – फारुख अब्दुल्ला

नवी दिल्ली : ३० मे – जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी जोपर्यंत तुम्ही लोकांची मनं जिंकत नाही तोपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये शांतता नांदू शकत नाही असं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या शेजाऱ्यांनाही आपण गुण्यागोविंदाने एकत्र राहू असं वाटलं पाहिजे असं मत व्यक्त केलं.
“तुम्ही जितकं हवं तितकं लष्कर आणू शकता. पण जोपर्यंत तुम्ही लोकांची मनं जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही शांतता आणू शकत नाही. युद्धातून हे अजिबात शक्य नाही. तुम्ही हवं तितकं लष्कर आणू शकता पण जोपर्यंत आपण आपल्या शेजाऱ्यांशी चर्चा करत नाही आणि तेदेखील गुण्यागोविंदाने एकत्र राहण्यासाठी तयार होत नाहीत तोवर काश्मीरमध्ये शांतता येणार नाही,” असं फारुख अब्दुल्ला म्हणाले आहेत.
अब्दुल्ला यांनी यावेळी युक्रेनचा दाखला देत आधुनिक युद्ध म्हणजे विध्वंसक शस्त्रं गेल्या ७२ वर्षांत उभारलेल्या सर्व गोष्टी नष्ट करू शकतात असं सांगितलं. “जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यांना वाईट वाटतं. आणि आपण काय बोलत आहोत? आम्ही भारतीय मुस्लिम आहोत, चिनी, रशियन किंवा अमेरिकन मुस्लिम नाही. आमच्यावर विश्वास ठेवा,” असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.
मनी लाँड्रिग प्रकरणी अब्दुल्ला यांची ईडीकडून चौकशी सुरु असतानाच हे वक्तव्य आलं आहे. ईडीने अब्दुल्ला यांना ३१ मे रोजी चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीच्या माहितीनुसार, हे प्रकरण जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील ११३ कोटींच्या कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे. २००६ ते २०१२ दरम्यान अब्दुल्ला संघटनेचे अध्यक्ष असताना हा आर्थिक घोटाळा झाला होता.
अब्दुल्ला यांनी आपण तपास यंत्रणांना सहकार्य करत असल्याचं म्हटलं असता दुसरीकडे पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भीती वाटत असल्याने केंद्र कारवाई करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Leave a Reply