हे देखील माहित करून घ्या..

मासे खाऊनही पवित्र ब्राह्मण कसे ?

दधीचि ऋषी आणि अलंबुजा अप्सरा यांचा मुलगा “सारस्वत”.

इंद्राच्या सवयीनुसार दधीचीच्या तपश्चर्येत व्यत्यय आणण्यासाठी त्याने अलंबुजेला दधीचीकडे पाठविली होती. ती सरस्वतीच्या पात्रातून बाहेर आली. दधीचि तिथे स्नानासाठी आला होता. अलंबुजेने त्याला काममोहित केले. त्याने तपश्चर्या अर्धवट सोडली. तिच्याभोवती पिंगा घालण्यातच त्याचे दिवस जाऊ लागले. काही महिन्यांनी अलंबुजेला मुलगा झाला. त्याला दधीचिपाशी ठेवून ती स्वर्गात निघून गेली. ती “सरस्वतीतून” आली होती व तेथेच त्यांची प्रथम भेट झाली होती. या प्रसंगाची आठवण म्हणून दधीचिने मुलाचे नाव ठेवले “सारस्वत”.

दधीचिने त्याला वाढवले व वेद-वेदांग-शास्त्रांत पारंगत केले.

दधीचीने देवांना आपली हाडे वज्र बनवण्यासाठी देऊन प्राणत्याग केला.

त्यानंतर देशाला अवर्षणाने ग्रासले. अन्नपाण्यासाठी लोक सैरावैरा भटकू लागले. ऋषीही तेच करू लागले. पठणासाठी त्यांना वेळ मिळेना. त्यामुळे त्यांचे ज्ञान पूर्ण हरवले. एकटा “सारस्वत” मात्र समुद्राकाठी राहिला. मासे खाऊन त्याने जीव जगवला. समुद्राला मिळणाऱ्या नद्यांचे गोडे पाणी तो पीत असे.

दुष्काळ संपला. आपले ज्ञान विस्मृतीच्या पडद्याआड गेल्याची ऋषींना जाणीव झाली. पुन्हा एकदा अध्ययन करण्यास ते सिध्द झाले. पण अध्यापन करणार कोण? ज्ञान कोणापाशीही नव्हते. बरीच भटकंती केल्यानंतर त्यांना “सारस्वत” सापडला. रोजचे पठण करत होता. जसाच्या तसा तेजःपुंज होता.

“सारस्वत! आम्ही आमचे ज्ञान विसरलो. तू तुझे ज्ञान टिकवलेस कसे?” त्यांनी कुतूहलाने विचारले.

सारस्वताने समुद्राकडे बोट केले. ऋषींनी भिवया उंचावल्या.

“खारट पाणी पिऊन जगलास?”

“नाही. मासे पकडले. गोड पाणी आहे जवळच.”

सारस्वताची प्रांजळ कबुली ऐकताच ऋषींमध्ये स्मशानशांतता पसरली.

सारस्वताने मासे खाल्ले म्हणजे अभक्ष्यभक्षण केले. तो बाटला त्याचे पावित्र्य ढळले. अशा अपवित्र माणसाकडून वेदांसारखे पवित्र ग्रंथ कसे काय शिकायचे? त्यांच्या मनात विचार सुरू झाले.

एवढ्यात एका स्त्रीचा आवाज ऐकू आला.

“सर्वसामान्य धर्मनियम आणि आपदधर्म यात फरक आहे. ‘आपदधर्म’ म्हणजे आपत्तीला तोंड देत असताना पालन करावयाचे धर्मनियम. हे धर्मनियम नेहमीच्या नियमांपेक्षा खूपच शिथिल असतात. आपत्तीकाळात अनेक प्रकारचे धार्मिक स्वातंत्र्य घ्यावं लागतं. कारण जीव जगवणं महत्त्वाचं असतं. सारस्वतानं मासे खाल्ले, हे खरं आहे. पण दुष्काळामुळे खाल्ले. मासे खाऊन त्याने जीव जगवला. म्हणून त्याला वेद सांभाळून ठेवता आले. आज या सबंध पृथ्वीवर वेद, वेदांग, शास्त्र जाणणारा तो एकटा आहे.”

ऋषींनी मागे वळून पाहिले. नदीकाठी साक्षात देवी सरस्वती उभी होती. सर्वजण तिच्या पाया पडले. तिने सर्वांना भरघोस आशीर्वाद दिले. सारस्वताला तिने एक खास वर दिला.

“मासे खाल्ले तरीही सारस्वताचं पावित्र्य भ्रष्ट होणार नाही असा मी त्याला वर देते. हा वर त्याच्या वंशजांनाही लागू होईल. त्यांनीही मत्स्यभक्षण केले तरी ते पवित्रच राहतील व वेदाभ्यासाचा त्यांचा अधिकार कायम राहील.”, सरस्वती म्हणाली व अंतर्धान पावली.

सर्व ऋषींनी सारस्वता कडून वेद, वेदांग, शास्त्रे पुन्हा शिकून घेतली. कांडानुक्रम नावाचा ऋग्वेदाचा एक पाठ सारस्वताच्या नावावर आहे. परंतु आज उपलब्ध नाही.

सरस्वतीच्या वरामुळे मासे खाऊनही सारस्वत ब्राह्मणांचे पावित्र्य अबाधित रहाते.

(संदर्भ : ऋषींच्या महान गोष्टी)

Leave a Reply