ताजमहाल परिसरात नमाज पठण करणाऱ्या ४ पर्यटकांना अटक

नवी दिल्ली : २९ मे – देशभरात अनेक मशिदींवरून वाद सुरू आहे. अगदी आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहालबाबतही वाद न्यायालयात गेला. अशातच ताजमहल परिसरात नमाज पठण करणं काही पर्यटकांना महागात पडलं आहे. गुरुवारी ताजमहाल परिसरात नमाज केल्यानं पोलिसांनी ४ पर्यटकांना अटक केली.
बुधवारी सायंकाळी ५ वाजता चार व्यक्ती ताजमहाल परिसरातील शाही मशीद परिसरात नमाज पठण करताना आढळले. आग्रा पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या ४ व्यक्तींपैकी ३ व्यक्ती हैदराबादमधील आहेत, तर एक व्यक्ती आझमगडमधील आहे. या सर्व व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहिता कलम १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपा युवा मोर्चाचे मीडिया इंचार्ज रजनीश सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर ताज महालबाबत याचिका दाखल केली आहे. यात आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला ताज महालमधील २२ खोल्यांचे दरवाजा उघडून सर्व्हे करण्याची मागणी करण्यात आली. तसेच ताज महाल हिंदू मंदीर असल्याचा दावा केला होता.

Leave a Reply